Justice Shekhar Kumar Yadav : ‘भारत बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसारच चालेल’, या विधानावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव ठाम !

क्षमा मागण्यास नकार !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘भारत बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसारच चालेल. कायदा हा बहुमताने चालतो’, असे विधान करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव अद्यापही या विधानावर ठाम आहेत. ८ डिसेंबर २०२४ या दिवशी उच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या समान नागरी कायद्याच्या सदंर्भातील कार्यक्रमात न्यायमूर्ती यादव यांनी वरील विधान केले होते. त्यानंतर देशात विरोधी पक्षांकडून त्यांचा विरोध चालू करण्यात आला. संसदेत त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचीही मागणी करण्यात आली होती. इतका विरोध झाल्यानंतरही न्यायमूर्ती यादव त्यांच्या विधानावर ठाम आहेत. या विधानासाठी क्षमा मागण्यासही न्यायमूर्ती यादव यांनी नकार दिला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कलोजियम’ने (न्यायमूर्तींची निवड करणारी यंत्रणा) त्यांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केले होते. कलोजियमसमोर बाजू मांडल्यानंतर न्यायमूर्ती शेखर यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अरुण भन्साळी यांना पत्र पाठवून त्यात भूमिका स्पष्ट केली आहे.

माझे विधान सामाजिक सूत्रांवरील माझ्या विचारांची अभिव्यक्ती असून राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरूनच ! – न्यायमूर्ती यादव

न्यायमूर्ती यादव यांनी मुख्य न्यायमूर्ती अरुण भन्साळी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. माझे विधान सामाजिक सूत्रांवरील माझ्या विचारांची अभिव्यक्ती असून राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरूनच आहे. कोणत्याही समाजाविरोधात द्वेषभावना निर्माण करणारी नाही. माझ्यासारखे न्यायपालिकेचे सदस्य सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. त्यामुळे मला न्यायव्यवस्थेतील वरिष्ठांकडून संरक्षण मिळायला हवे.


काय म्हणाले होते न्यायमूर्ती शेखर यादव ?

न्यायमूर्ती शेखर यादव म्हणाले होते, ‘तुमच्या (मुसलमानांच्या) मनात गैरसमज आहे की, जर समान नागरी कायदा अस्तित्वात आला, तर तो तुमच्या शरीयतविरोधी, इस्लामविरोधी आणि कुराणविरोधी असेल. तुमचा ‘पर्सनल लॉ’ असो किंवा आमचे हिंदू कायदे, तुमचे कुराण असो किंवा आमची भगवद्गीता. आम्ही आमच्या चालीरीतींमधील अनेक चुकीच्या गोष्टींचे निराकरण केले आहे; मग तुम्हाला या कायद्याच्या कार्यवाहीवर काय हरकत आहे ? तुमची पहिली पत्नी असतांना तुम्ही ३ विवाह करू शकता, तेही पहिल्या पत्नीच्या सहमतीविना. हे अस्वीकारार्ह आहे.’

Full Controversial Speech by Justice Shekhar Kumar Yadav, Judge, Allahabad High Court | Law Today

(सौजन्य : Law Today)

संपादकीय भूमिका

जर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली सूट दिली जात असेल, तर न्यायमूर्तींनी जे सत्य आहे ते सार्वजनिक ठिकाणी मांडल्यावर त्याच्यावर आक्षेप का ?