हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना निमंत्रण
श्री सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – नदी ही जिवंत असते. मनुष्याला जीवनात नदीच साहाय्य करते. नद्या जीवन तथा पर्यावरण यांचे पोषण करते; मात्र वर्तमानस्थितीत नद्यांची अवस्था दयनीय आहे. गंगामाता आणि नर्मदा या नद्यांप्रती आमची विशेष श्रद्धा आहे. असे असले, तरी नदी प्रदूषणाची समस्या तथा उपाय यांच्या अनुषंगाने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता महाकुंभ येथील सेक्टर २ मधील गंगा पंडाल, किला रोड, परेड मैदान येथे ‘नदी संवादा’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सरकारच्या गोष्टी सरकारसमवेत आणि समाजाच्या गोष्टी समाजासमवेत करण्याविषयी योजना सिद्ध केली जाईल, अशी माहिती नदी संवाद कार्यक्रमाचे आयोजक तथा अग्नीशमन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. जुगुल किशोर तिवारी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
श्री. जुगुल किशोर तिवारी पुढे म्हणाले, ‘‘नद्यांना आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे. नद्यांनीच मनुष्याला जीवन आणि वैभव दिले आहे. आपल्याकडून नद्यांची काय अपेक्षा आहेत ?, हे सद्गुरु आणि संत यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला सर्वांनी आर्वजून उपस्थित रहवे.’’
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना निमंत्रण !

श्री. जुगुल किशोर यांनी १६ जानेवारी या दिवशी महाकुंभनगरी सेक्टर १९, मोरी-मुक्ती मार्ग येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.