श्री. यज्ञेश सावंत, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज – महाकुंभनगरीत वाहतुकीसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची अनुमती पत्रे (पास) मिळवण्यासाठी मेळा प्राधिकरण कार्यालयात विविध संस्था, संघटना आणि संप्रदाय यांचे कार्यकर्ते अन् अनुयायी यांची झुंबड उडाली आहे. कुंभक्षेत्री ये-जा करण्यासाठी वाहनांची अनुपत्रे मिळवावी लागतात. त्यासाठी कुंभपर्व चालू होण्यापूर्वी आवेदन करावे लागते. नंतर मेळा प्राधिकरणातून त्यांनी आवेदनात नमूद केलेल्या वाहन क्रमांकांच्या वाहनांचा पास मिळतो. हा पास मिळवण्यासाठी काहींना अनेक वेळा खेटे मारावे लागत आहेत. यामुळे संप्रदाय, संस्था यांच्या पदाधिकार्यांसह संबंधित संप्रदायाचे साधू-संत मेळा कार्यालयात येऊन संताप व्यक्त करत आहेत.
लोकांनी संयम बाळगावा ! – प्रशासन
याविषयी मेळा प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात २२ सहस्रांहून अधिक संस्था, संप्रदाय सहभागी आहेत. त्यांच्या एका एका गाडीची पूर्ण छाननी करून पास देणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. काही संस्थांच्या २ हून अधिक गाड्या आहेत. आम्ही प्रयत्न करत आहोत लोकांना लवकरात लवकर पासचे वितरण करावे; मात्र अवाका अधिक असल्याने लोकांनी संयम बाळगावा.
अपूर्ण कागदपत्रे असूनही पाससाठी अग्रह धरणे चुकीचे !
कार्यालयातील पदाधिकार्यांनी सांगितले की, काही वाहनांची कागदपत्रे पूर्ण नाहीत, तरीही असे लोक आमच्याकडे पास देण्यासाठी आग्रह धरतात. काही वेळा अधिक वेळा यावे लागल्यास संप्रदाय, संस्था यांची माणसे त्यांच्या साधू-संतांना येथे घेऊन येतात. त्यांना विषय माहिती नसल्याने येथे पुष्कळ गोंधळ होतो आणि आम्हाला समजावून सांगताही येत नाही. त्यामुळे सर्वांनीच आम्हाला सहकार्य करावे.