प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभनगरीत आखाडे, संप्रदाय, खालसे आणि आध्यात्मिक संस्था यांचे भव्य तंबू उभारण्यात आले आहेत. यासह सेक्टर ७ येथे शासनाने अनेक भव्य तंबू उभारून त्याद्वारे अनेक शासकीय योजनाची माहिती जनतेला उपलब्ध करून दिली आहे. या तंबूमध्ये सूचना प्रसारण मंत्रालयाकडून भारत सरकारच्या विविध यशस्वी योजना, नीती आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती, तसेच राष्ट्रीय आपत्तीविरोधी प्राधिकरण, प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना यांची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांचेही स्टॉल लावण्यात आले आहेत. ही माहिती डिजिटल फलक, टीव्ही स्क्रीन, होलोग्राफिक सिलिंडर इत्यादींद्वारे दर्शवण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठीच्या प्रदर्शनात आग, भूकंप, थंडी, जंगलातील आग, पूर या आपत्तींच्या वेळी काय करावे ? हे डिजिटल फलकांद्वारे दर्शवण्यात आले आहे. सूचना प्रसारण मंत्रालयाच्या कक्षात विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या माहितीसह महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी माहिती दिली आहे. कृषी विभागाच्या प्रदर्शनात भरड धान्याच्या उत्पादनांसह भाज्यांच्या बिया उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन पहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
कुंभनगरीत अनेक राज्यांनी उभारले त्यांचे दर्शन मंडप !
कुंभनगरीत उत्तराखंड, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांनी त्यांचे दर्शन मंडप उभारले आहेत. या दर्शन मंडपांमध्ये संबंधित राज्यांची संस्कृती, तेथील कला प्रदर्शित केली जाते. उत्तराखंड शासनाने उभारलेल्या प्रदर्शनातील तेथील बद्रीनाथ, केदारनाथ या हिंदूंच्या धार्मिक स्थळांची माहिती आणि काही प्रतिकृती उभारल्या आहेत. या ठिकाणी सायंकाळच्या वेळी होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांना लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.