Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी एकत्र यावे ! – स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज

प्रयागराज कुंभपर्व २०२५

भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी महायज्ञाचे आयोजन !

श्री. यज्ञेश सावंत आणि श्री. गिरीश पुजारी, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज

प्रयागराज – भारतात प्रथमच रुद्राक्षांची ११ फूट उंच आणि ९ फूट रुंद अशी रचना करून शिवलिंग बनवण्यात आले आहे. यासाठी ५ कोटी ५५ लाख रुद्राक्षांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगांचे ११ सहस्र १०८ त्रिशूळ लावण्यात आले आहेत. यांतील काळे त्रिशूळ आतंकवाद नष्ट करण्यासाठी, पांढरे त्रिशूळ ज्ञान, विद्या आणि बुद्धी यांसाठी, पिवळे त्रिशूळ अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आणि भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी लावण्यात आले आहेत. यासह स्तंभ आणि नंदी यांची स्थापना करण्यात आले आहे. भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी आणि आतंकवाद नष्ट होण्यासाठी श्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली. स्वामी मौनी महाराज हे ’अखिल भारतीय हिंदु संरक्षण समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

हिंदु राष्ट्राविषयी बोलतांना स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंच्या भयावह हत्या होत आहेत. तेथील माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. तेथील हिंदू भयभीत आहेत. अशा वेळी एक सुरक्षित आणि चांगली व्यवस्था भारतात असणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र झाले नाही, तर इस्लामी आतंकवाद वाढेल, खलिस्तानी आतंकवाद वाढेल आणि जगभर असुरक्षितता निर्माण होईल. सर्वांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प घेऊन कार्यरत झाले पाहिजे.

हिंदूंनी जातीजातींमध्ये विभागले जाऊ नये. जातींपेक्षा हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे. हिंदूंनी आदिवासी, वनवासी, गरीब यांच्यासाठी कार्यरत झाले पाहिजे. हिंदू जातींमध्ये विभागलेले राहिले, तर देशाचे कल्याण होणार नाही.

रुद्राक्षाचे महत्त्व काय ?

रुद्राक्ष म्हणजे अशी शक्ती आहे की, ज्याद्वारे आपण लक्ष्मी, पुत्र, ऐश्वर्य, विजय, तेज, बल, पराक्रम, आरोग्य इत्यादी अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो. रुद्राक्ष एक कवच आणि वरदान आहे. त्यापासून जे पाहिजे, ते प्राप्त करू शकतो. यासाठी रुद्राक्ष धारण करा, रुद्राक्ष मिळवून तो सिद्ध करा, असे आवाहन स्वामी अभय चैतन्य फलाहारी मौनी महाराज यांनी केले.

हे ही वाचा → Prayagraj Kumbh Parva 2025 : ५ कोटी ५५ लाख रुद्राक्षांद्वारे महाकुंभपर्वात १२ ज्योर्तिलिंगांची निमिर्ती !