Akhilesh Yadav On Mahakumbh : (म्हणे), ‘महाकुंभपर्वासाठी ७ कोटी भाविक आल्याची आकडेवारी खोटी !’

  • समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे हिंदुद्वेषी विधान

  • भाजपकडून प्रत्युत्तर !

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव

प्रयागराज – येथे १३ ते १६ जानेवारी या कालावधीत पवित्र त्रिवेणी संगमात ७ कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा सरकारने केला आहे. तथापि ही आकडेवारी खोटी आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली. महाकुंभपर्वात भाविकांच्या संख्याविषयीची सरकारची प्रत्येक माहिती खोटी आहे. काही गाड्या रिकाम्या जात आहेत, असेही ते म्हणाले. (समाजवादी पक्षाचे सरकार असतांना १० फेब्रुवारी २०१३ या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या काळी मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठीही सपा सरकारने कोणतेही साहाय्य दिले नाही. त्यामुळे स्वतःची सत्ता असतांना कुंभमेळ्यात भाविकांच्या जिवाची पर्वा न करणे, तसेच त्यांना सुविधा न देणारे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हिंदद्वेषी आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात चुक काय ? – संपादक)

सरकारला यादव यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! – भाजप

यावर देहली येथील चांदनी चौक भागाचे भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, सरकारला अखिलेश यादव यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही. महाकुंभ लोकांमध्ये कसा लोकप्रिय होतो आहे, याकडे जगाचे लक्ष आहे. महाकुंभासाठी देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येत आहेत.

महाकुंभाच्या संदर्भात अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री दयाशंकर सिंह म्हणाले की, यापेक्षा मोठा धार्मिक कार्यक्रम जगात नाही. ही सर्व विधाने करून अखिलेश यादव यांना काय दाखवायचे आहे ? हे त्यांनीच समजून घेतले पाहिजे. मतांचे राजकारण व्हायला हवे; पण जेव्हा भारताची संस्कृती आणि सभ्यता यांचा प्रश्न येतो, तेव्हा आपण सर्वांनी संघटित होऊन देश भक्कम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

योगींनी जे केले ते सर्वांना शक्य नाही ! – श्री अनिरुद्धाचार्य महाराज

श्री अनिरुद्धाचार्य महाराज

श्री अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले, ‘‘संपूर्ण देश महाकुंभाचा पवित्र सण साजरा करत आहे. मुख्यमंत्री योगी यांनी अवघ्या ४ मासांत महाकुंभनगरची स्थापना केली. तेथे भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. शहर वसवणे हे प्रत्येकाच्या हातात नाही. योगींनी जे केले ते सर्वांना शक्य नाही. संपूर्ण परिसरात व्यवस्थेत कसलीही कमतरता नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मौनी अमावस्येची सिद्धता पहाणार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ जानेवारी या दिवशी त्रिवेणी संगम येथे येणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी होणार्‍या मौनी अमावस्या स्नानाची सिद्धता ते पहाणार आहेत. या दिवशी अनुमाने ८-१० कोटी भाविक स्नान करतील, असा सरकारचा अंदाज आहे. योगी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत आढावा घेणार आहेत. यात्रा क्षेत्राचे निरीक्षणही करू शकतात.वर्ष २०१३ मध्ये कुंभमेळ्याचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार घडले, भाविकांना सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे हिंदूंविषयी कायम द्वेषाची भूमिका घेणार्‍या अखिलेश यादव यांना महाकुंभविषयी बोलण्याचा अधिकार नाही !

त्रिवेणी संगमात आतापर्यंत ७ कोटींहून अधिक भाविकांनी केले स्नान !

योगी आदित्यनाथ सरकारच्या माहितीनुसार महाकुंभपर्व चालू झाल्यापासून आतापर्यंत, म्हणजे ४ दिवसांत ७ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.

संपादकीय भूमिका

आझमखान हे कट्टरतावादी मुसलमान असून ते हिंदुद्वेषी होते. तरीही वर्ष २०१३ मध्ये सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाने कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री म्हणून आझम खान यांना नियुक्त केले होते. त्यामुळे त्यांनी कुंभमेळ्याचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार घडले, भाविकांना सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे हिंदूंविषयी कायम द्वेषाची भूमिका घेणार्‍या अखिलेश यादव यांना महाकुंभविषयी बोलण्याचा अधिकार नाही !