कुंभमेळा हा अंधश्रद्धा असल्याचा हिंदुद्वेषी प्रचार करणार्‍या नास्तिकतावाद्यांना नागा साधूंनी चोपले !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ज्या कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे देश-विदेशातून कोट्यवधी भाविक श्रद्धेने आले आहेत. लाखो भाविकांना जेथे भगवंताच्या कृपेची प्रचीती आली आहे, अशा तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात नास्तिकतावादी लोक कुंभमेळा हा अंधश्रद्धा असल्याचा प्रचार करत होते. हे निदर्शनास येताच नागा साधूंनी नास्तिकतावाद्यांना चोप दिला. त्यानंतर नास्तिकतावाद्यांनी स्वत:चा गाशा गुंडाळून तेथून पळ काढला.

कुंभमेळ्यामध्ये सेक्टर क्रमांक २० मधील काली मार्गावर १० क्रमांकाच्या पांटुन पुलाजवळ येथे नुकताच हा प्रकार घडला. येथे नास्तिकतावाद्यांच्या काही कार्यकर्त्यांनी कक्ष उभारला होता. या कक्षावर ‘महाकुंभ हा अंधश्रद्धेचा मेळा आहे’, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते, तसेच माईकवरून हे नास्तिकतावादी कार्यकर्ते उद्घोषणा करत होते. या मार्गावरून जाणार्‍या नागा साधूंना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नास्तिकतावाद्यांना हटकले आणि त्यांचा कक्ष उधळून लावला. ज्या महाकुंभमेळ्यात नागा साधू वर्षांनुवर्षे येऊन अमृत स्नान करतात, त्या कुंभमेळ्याला अंधश्रद्धा संबोधल्याने संतप्त झालेल्या नागा साधूंनी नास्तिकतावाद्यांच्या कक्षाची तोडफोड केली. या वेळी नास्तिकतावाद्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांना नागा साधूंनी चोप दिला. या कक्षावर महिला कार्यकर्त्याही होत्या; मात्र त्यांना नागा साधूंनी काही केले नाही. ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत नागा साधूंनी नास्तिकतावाद्यांना पिटाळून लावले. नागा साधूंनी या कक्षाची तोडफोड करून त्यांच्या साहित्याला आग लावली.