Prayagraj Kumbh Parva 2025 : सनातन संस्कृती प्रदर्शन म्हणजे एक नवीन समुद्रमंथन ! – डॉ. धर्म यश, ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’, बाली, इंडोनेशिया

प्रयागराज कुंभपर्व २०२५

महाकुंभात इंडोनेशिया येथील ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’च्या सदस्यांची सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला सदिच्छा भेट  !

सनातनचे ग्रंथ प्रदर्शन जिज्ञासेने पाहून त्यातील माहिती समजून घेतांना ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’चे सदस्य

प्रयागराज, १६ जानेवारी (वार्ता.) : सनातन संस्कृती प्रदर्शनच म्हणजे एक नवीन समुद्रमंथन आहे. समुद्रमंथन अशा दृष्टीने की, सनातन संस्था वैज्ञानिक आणि शास्त्रीय परिभाषेत संशोधन करून धर्माचरणाच्या प्रत्येक कृतीमधील शास्त्रीय कारण प्रमाण देऊन सांगते. या कारणास्तव मी त्याला ‘समुद्रमंथन’ असे म्हटले आहे, असे प्रतिपादन बाली (इंडोनेशिया) येथील ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. धर्म यश यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी वंदनीय उपस्थिती लाभली.

महाकुंभ पर्वातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला डॉ. धर्म यांसह ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’च्या सदस्यांनी १४ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रदर्शन पाहून सर्व सदस्य भारावून गेले. सर्वांनी मोठ्या जिज्ञासेने प्रदर्शनातील फलकांवरील धर्मशिक्षण, अध्यात्म, राष्ट्र यांविषयीची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे डॉ. धर्म यश यांनी इंडोनेशिया येथील भाषेत त्यांच्या सदस्यांना प्रदर्शनातील प्रत्येक फलकांवरील माहिती समजावून सांगितली.

डॉ. धर्म यश इंडोनेशिया येथील भाषेत त्यांच्या सदस्यांना प्रदर्शनातील प्रत्येक फलकांवरील माहिती समजावून सांगतांना

सनातनचे कार्य भारतासह जगभर पसरायला हवे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी संवाद साधतांना डॉ. धर्म यश (डावीकडे)

डॉ. धर्म यश म्हणाले,

‘‘आपण एखादी कृती करतांना एवढा सखोल विचार कधी करत नाही. वेदांवर आपला विश्वास आणि श्रद्धा असते. आजकाल सर्वत्र धर्माविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे धर्माचरण करतांना वैज्ञानिक प्रमाण दिल्यास लोक लगेच विश्वास ठेवतात. सनातन संस्था ही वैज्ञानिक आणि शास्त्रीय परिभाषेत संशोधन करून धर्मशिक्षण आणि धर्माचरण करण्यास सर्वांना उद्युक्त करत आहे. म्हणूनच सनातन संस्थेचे कार्य एकमेवाद्वितीयच आहे. हे कार्य भारतासह जगभर पसरायला हवे.’’