पोलिसांच्या थकीत निवडणूक भत्ता मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण !

सातारा, १६ जानेवारी (वार्ता.) – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रामाणिकपणे सेवा करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचे निवडणूक बंदोबस्ताच्या कालावधीमधील निवडणूक भत्ता आणि मानधन दिले नाही. हे मानधन आणि निवडणूक भत्ता मिळावा या मागण्यांसाठी २६ जानेवारीला आमरण उपोषण करण्याची चेतावणी ‘पोलीस बॉईज संघटने’ने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या सीमेवर, तसेच संवेदनशील ठिकाणी दिवस-रात्र नाकाबंदी केली जाते. गाड्यांची पडताळणी, निवडणूक पेट्यांची सुरक्षा, वाहतूक सुरक्षा अशा अनेक गोष्टींचे पूर्णतः उत्तरदायित्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर असते; मात्र वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे, तसेच वर्ष २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सेवेमध्ये नियुक्त असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना मानधन अन् निवडणूक भत्ता मिळालेला नाही. हा तात्काळ देण्यात यावा, यासाठी महसूल विभागाच्या संबंधित शासन निर्णयाचा आधार घेण्यात यावा. याविषयी अनेकवेळा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी यांच्याशी लेखी पत्रव्यवहार झाले आहेत; परंतु त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे ‘पोलीस बॉईज संघटने’कडून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मागण्यांची गांभीर्याने नोंद न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.

संपादकीय भूमिका :

पोलिसांवर अशी वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?