‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित !

पुरस्कार स्वीकारतांना श्री. रवींद्र प्रभुदेसाई, समवेत अन्य मान्यवर

नागपूर – ‘पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने ‘पितांबरी’ आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतेच नलिनी बाळकृष्ण देवपुजारी पुरस्कृत ‘जीवनगौरव’ पुरस्काराने येथे सन्मानित केले. या वेळी शुभांगी भडभडे, डॉ. पंकज चांदे, सुदर्शन शेंडे, प्रकाश दीक्षित, नरेंद्र जोग आणि डॉ. सतीश देवपुजारी उपस्थित होते.

पितांबरी आस्थापनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पितांबरीने केवळ भारतातच नव्हे, तर अभिनव उत्पादनांच्या माध्यमातून जगभरात उद्योग विस्तार केला आहे. मराठी उद्योग जगतात ‘मराठी ब्रँड’ म्हणून रवींद्र प्रभुदेसाई यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या दृष्टीने नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवउद्योजक घडवण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न, तसेच त्यांचे सामाजिक दायित्व यांची नोंद घेऊन हा पुरस्कार प्रदान केला आहे.

मराठी उद्योजक घडून ते १०० वर्षे टिकायला हवेत ! – रवींद्र प्रभुदेसाई

‘शक्य तेथे उद्योगाचा प्रचार-प्रसार करणे हे माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे. राज्यात सर्वत्र मराठी उद्योजक घडले पाहिजेत आणि ते किमान १०० वर्षे टिकायला हवेत. त्यांचा सतत विकास होत गेला पाहिजे’, असे मनोगत रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.