
भोर (पुणे) – भोर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या श्रीपतीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली ४ घरे फोडली. यात १८ तोळे सोने, अडीच किलो चांदीसह, ९ लाख १० सहस्र रुपये रोकड असे एकूण २६ लाखांचा मुद्देमाल चोरून चोरटे फरार झाले आहेत. चोरीमुळे शहरातील नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. चारही घरे बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती सोमवारी दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आहे.
श्री मांढरदेवी यात्रेच्या कालावधीत भोर शहर आणि श्री मांढरदेवीच्या मार्गावर असलेल्या गावांमधून चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. श्री मांढरदेवीच्या यात्रेत गर्दी असल्यामुळे आणि पोलीस हे यात्रेच्या बंदोबस्तासाठी व्यस्त असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. यापूर्वी श्री मांढरदेवीच्या यात्रेच्या काळात बालवडी आणि कासुर्डी गुमा येथे घरफोड्या आणि चोर्या झाल्या आहेत. चोरट्यांच्या मारहाणीत कासुर्डी गुमा येथील एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची घटना घडली होती.
संपादकीय भूमिका :पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चोरी होणे हे पोलिसांचा गुन्हेगारावर त्यांच्या भागातही वचक नसल्याचा परिणाम ! |