प्रवास करणार्‍याचा व्यापारी किंवा सहप्रवासी हाच मित्र !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : किं स्वित् प्रवसतो मित्रम् ?

अर्थ : प्रवास करणार्‍याचा मित्र कोण ?

उत्तर : सार्थः ।

अर्थ : व्यापारी किंवा सहप्रवासी.

आपल्याकडे काही बारीकसारीक नियम सांगितलेले आहेत. तपश्चर्या एकट्याने करावी. परिस्थितीवशात सामुदायिक प्रार्थना इत्यादी प्रकार अलीकडे निर्माण झाले आहेत. त्याचा काही लाभही आहे; पण ‘प्रार्थना करणे’, म्हणजे तप नव्हे. ‘कोणतेही धार्मिक कृत्य, म्हणजे तप’, असे म्हणता येणार नाही. तपश्चर्येसाठी एकटेच असणे आवश्यक आहे. दोघांनी मिळून अभ्यास करावा. तिघांनी मिळून चर्चा करावी. प्रवासात चौघे जण असलेले बरे.

एकट्या दुकट्याने प्रवास करणे, हे फार अडचणीचे होते. अलीकडे कुणालाही सामान सांभाळण्यास सांगणेही शक्य राहिले नाही. तेव्हा ‘साहाय्यक आणि साथी असणे’, हे प्रवासात अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी अलीकडच्या सोयी काहीच नव्हत्या. व्यापारी आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने भ्रमंती करत असत. त्यांचा तांडा आणि त्यांच्यासमवेत संरक्षणाची योजनाही सज्ज असे. त्यामुळे त्यांच्यासह प्रवास करणे, हे सोयीचे आणि सुरक्षित असे. प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. क्वचित् व्याधी उत्पन्न होतात; म्हणून ‘कुणी परिचयाचे आणि ओळखीचे असणे’, हे आवश्यक ठरते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)