स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानच्या कारावासात काळ्या पाण्याची ५० वर्षांची शिक्षा भोगत होते. नाशिकमध्ये २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जॅक्सन याच्या वधामुळे अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघा क्रांतीकारकांना फाशी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना २ जन्मठेपा आणि ‘अभिनव भारता’च्या ३० कार्यकर्त्यांना विविध शिक्षा या हिंदुस्थानातील ब्रिटीश सरकारने दिल्या. विशेष म्हणजे जॅक्सन वधाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्थानातसुद्धा नव्हते. अंदमानमधील सेल्युलर कारागृहामध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शरीर अस्थीपंजर झाले होते.

अंदमानमधील सेल्युलर कारागृहामधून मे १९२१ मध्ये त्यांना बंगालमधील ‘अलिपूर’ तुरुंगामध्ये स्थलांतरित केले. पुढे त्यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात पाठवले. त्यानंतर जानेवारी १९२४ पासून त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ठेवले. त्या वेळी त्यांच्यावर ‘राजकारणात भाग न घेणे आणि रत्नागिरी जिल्ह्याबाहेर न पडणे’, या अटी लादल्या होत्या. हिंदुस्थानातील ब्रिटीश सरकारने वर्ष १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची त्या स्थानबद्धतेमधून सुटका केली; परंतु वरील अटी कायम ठेवल्या; मात्र त्यांना इतिहासावर लेख लिहिण्यास बंदी नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या सुमारास लिहिलेल्या पुढील लेखाची मार्मिकता लक्षात घेण्यासारखी आहे.
१. इतिहास
८ व्या शतकाच्या प्रारंभीला उमय्याद खलिफाने दक्षिण युरोपमधील समृद्ध असलेले आयबेरियन द्वीप (स्पेन आणि पोर्तुगाल) कह्यात घेऊन त्याला ‘अल-अन्दलुस’ नाव दिले आणि तेथे इस्लामी सत्ता स्थापन केली. पुढील १०० वर्षांत दक्षिण युरोपमध्ये इस्लामी सत्तेचा उत्तम जम बसला. स्थानिक ख्रिस्त्यांनी इस्लामी सत्तेविरुद्ध अनेक अयशस्वी उठाव केले. शेवटी १५ व्या शतकाच्या अखेरीस स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिस्त्यांचा इस्लामी सत्तेविरुद्धचा ‘पुनर्विजय’ (स्पॅनिश/पोर्तुगीज भाषेत ‘रिकॉन्क्विस्टा’) पूर्ण झाला.

२. मुसलमानांनी पादाक्रांत केलेला स्पेन मुसलमान मुक्त कसा झाला ?
हिंदुस्थानवर मुसलमानांची आक्रमणे चालली होती, त्याच कालखंडात स्पेन देशासही पादाक्रांत करून त्या देशात अरब विजेत्यांनी उमय्याद खलिफाच्या अधिपत्याखाली एक प्रबळ इस्लामी राजसत्ता स्थापन केली होती. अर्थातच युरोपातील इतर भागांत चालू होती, तशीच मुसलमानांची धार्मिक आक्रमणे स्पेन देशातील ख्रिस्त्यांवरही चालू होऊन अनन्वित अत्याचारांचा कहर उसळला. अगणित ख्रिस्ती स्त्री-पुरुषांना बाटवण्यात किंवा ठार मारण्यात आले. पुढे काही शतकांनंतर मुसलमानांमध्येच आपापसांत यादवी माजली. तेव्हा युरोपातील बळावत चाललेल्या फ्रान्ससारख्या ख्रिस्ती राष्ट्राच्या साहाय्याने आणि पोपच्या प्रबळ प्रोत्साहनाने मुसलमानांच्या राजकीय अन् धार्मिक पिडनामुळे गांजून गेलेल्या स्पेनमधील ख्रिस्ती लोकांनी आपल्या एका जुन्या राजवंशाच्या नेतृत्वाखाली इस्लामी राजसत्तेविरुद्ध मोठे बंड उभारले. अनेक वर्षांच्या लढायांनंतर शेवटी इ.स. १५ व्या शतकात स्पॅनिश ख्रिस्त्यांनी इस्लामी राजसत्तेचा पुरता बीमोड केला; परंतु हिंदुस्थानाप्रमाणेच स्पेनमध्येही मुसलमानांच्या हातून जरी राजसत्ता हिसकावली गेली होती, तरीही मुसलमानांनी बाटवलेल्या अगणित स्पॅनिश ख्रिस्त्यांवर आणि त्यांच्या वसतीखाली असलेल्या भूक्षेत्रावर मुसलमानांनी जी इस्लामी धर्मसत्ता स्थापलेली होती, ती तशीच अबाधित राहिली होती. इतकेच नव्हे, तर स्पॅनिश राष्ट्राला पुढे-मागे दुभंगून टाकण्यासही कारणीभूत होण्याइतकी ती स्फोटक आणि भयावह होती. हे संकट त्यांना डोळ्यांपुढे धडधडीत दिसत होते आणि मुसलमानांनी पूर्वी केलेल्या धार्मिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड घेण्यासाठी जे नेहमी टपलेले असत, त्या स्पॅनिश ख्रिस्त्यांनी इस्लामी राजसत्तेप्रमाणेच वरील मुसलमानी धर्मसत्तेलाही धुळीस मिळवण्याचा निर्धार केला.
२ अ. स्पॅनिश ख्रिस्ती राजसत्ता आणि जनता यांनी स्वधर्मियांना बाप्तीस्मा देऊन स्वधर्मात घेणे आणि इस्लामचे समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करणे : त्यातही ख्रिस्ती लोकांच्या पायांत काही हिंदू लोकांप्रमाणे रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी इत्यादी ‘धर्माचारांच्या’ बेड्या ठोकलेल्या नव्हत्या. त्यामुळे मुसलमानांनी बाटवलेल्या त्यांच्या ख्रिस्ती स्त्री-पुरुषांना ‘बाप्तीस्मा’ देऊन आणि शुद्ध करून ख्रिस्ती धर्मात परत आणण्याचे कार्य राजकीय रणात विजयी झालेल्या स्पॅनिश लोकांना मनात येताच पार पाडण्याइतके सुलभ होते; मात्र त्यात अडचण होती ती इस्लामी राजसत्तेची आणि आणि शस्त्रबळाची ! तिचा नायनाट होताच स्पॅनिश ख्रिस्ती लोकांनी सार्या स्पेन देशातून इस्लाम धर्माचा उच्छेद करण्यासाठी एकच धुमाकूळ घातला. मुसलमानांनी बाटवलेल्या सहस्रावधी ख्रिस्त्यांना पुन्हा बाप्तीस्मा देण्याची असंख्य सत्रे चालू झाली. मुसलमानांकडून यत्र तत्र सशस्त्र संघर्ष होतो, असे दिसताच स्पेनचे नागरिक अधिकच चिडून गेले. स्पेनच्या ख्रिस्ती राजसत्तेने आणि जनतेने प्रगट प्रतिज्ञा केली, ‘स्पेनमध्ये मुसलमान म्हणवणारा कोणताही मनुष्य किंवा मशीद म्हणवणारे कोणतेही बांधकाम यापुढे अस्तित्वात रहाता कामा नये !
स्वतंत्र झालेल्या स्पेनच्या राज्यशासनाने एक निश्चित अवधी ठरवून दिला आणि सार्या देशभर एक घोषणा करवली, ‘या अवधीच्या आत झाडून सार्या मुसलमान स्त्री-पुरुषांनी एकतर आपणहून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला पाहिजे, अन्यथा त्यांनी त्या अवधीत सहकुटुंब देशाच्या बाहेर कायमचे निघून गेले पाहिजे; परंतु जे कुणी मुसलमान त्या ठरलेल्या अवधीत ख्रिस्तीही होणार नाहीत किंवा देशही सोडणार नाहीत, त्या सर्व मुसलमान स्त्री-पुरुषांचा एकजात शिरच्छेद केला जाईल !
२ आ. स्पॅनिश ख्रिस्त्यांनी मुसलमानांच्या रक्ताचे पाट वहाणे : काय म्हणता ? कोण घोर ही राजाज्ञा ! होय; परंतु हेही ध्यानात ठेवा, ‘स्पेनला जेव्हा मुसलमानांनी जिंकले तेव्हा त्यांनी याहूनही अघोर असे अत्याचार ख्रिस्ती जनतेवर तेथे बळाने धर्मांतर घडवून आणण्यासाठी केलेले होते. त्या वेळी ख्रिस्त्यांच्या रक्ताचे पाट मार्गोमार्गी मुसलमानांनीही वहावले होते ! आता मुसलमानी रक्ताचे पाट मार्गोमार्गी ख्रिस्ती वहाणार होते. वर उल्लेखलेला अवधी संपताच स्पॅनिश ख्रिस्त्यांनी ठिकठिकाणी उठाव करून स्पेनमध्ये उरलेल्या मुसलमानांचे त्या इस्लामी स्त्री-पुरुषांचे, अबाल-वृद्धांचे सरसकट शिरकाण केले. इस्लामी रक्तात न्हाऊन स्पेनची चर्च ‘शुद्ध’ झाली ! स्पेन मुसलमान झाल्यामुळेच ते ‘स्पेन’ राहिले, त्याचे ‘मोरोक्को’ झाले नाही !
मुसलमानांची तीच दुर्दशा पोलंड, सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस इत्यादी ख्रिस्ती देशांत होऊन त्या त्या देशांनीही इस्लामी राज्याच्या आणि त्या धर्माच्या पंजाखाली पिचलेले आपापले देश स्वतंत्र करून इस्लाममुक्त केले !
(संदर्भ : ‘समग्र सावरकर वाङ्मय’, खंड ३, इतिहास १)
– विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त), पुणे.
संपादकीय भूमिकापरकीय राजवट आणि गुलामगिरी यांच्या खाणाखुणा कशा मिटवायच्या हे स्पेनच्या जनतेकडून शिकायला हवे ! |