Mahakumbh 2025 : मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी १० कोटी भाविक येण्याची शक्यता ! – उत्तरप्रदेश सरकार

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून व्यापक सिद्धता करण्याचे निर्देश

  • आतापर्यंत ६ कोटींहून अधिक भाविकांनी केले त्रिवेणी संगमात स्नान

प्रयागराज – महाकुंभपर्वातील पहिल्या अमृतस्नानाच्या यशस्वी आयोजनानंतर सरकार पुढील प्रमुख स्नानांच्या सिद्धतेसाठी प्रयत्नशील आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी, म्हणजे २९ जानेवारीला अनुमाने १० कोटी भाविक त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी  येण्याची शक्यता राज्य सरकारने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला व्यापक सिद्धता करण्याचे निर्देश दिले आहेत. १३ जानेवारीपासून चालू झालेल्या महाकुंभपर्वाच्या पहिल्या स्नानापासून आतापर्यंत ६ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. मकर संक्रांतीला, म्हणजे १४ जानेवारीला पहिल्या अमृत स्नानाच्या वेळी ३ कोटी ५० लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. पुढील मोठे अमृतस्नान २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावस्येला होणार आहे. १५ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत महाकुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, मौनी अमावस्येला ८ ते १० कोटी भाविकांच्या आगमनाची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्था अधिक प्रभावी आणि सुयोग्य असण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले जावे. नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जावी, जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही.

ते पुढे म्हणाले की, महाकुंभ क्षेत्रातील मोबाइल नेटवर्क अधिक चांगले करण्यासाठी सेवा प्रदान करणार्‍या आस्थापनांशी चर्चा केली जावी. भाविकांसाठी बस, शटल बस आणि इलेक्ट्रिक बस यांचे संचालन सुरळीतपणे चालू ठेवावे, जेणेकरून प्रयागराज येथे येणार्‍या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. शौचालयांची नियमित स्वच्छता, घाटांची बॅरिकेडिंग (लोखंडी सांगाडा), तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये २४ घंटे वीज आणि पिण्याचा पाणीपुरवठा सुनिश्चित केला जावा.