महाकुंभनगरीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला प्रारंभ !

त्रिवेणी संगमासह, महाकुंभमेळा, गंगाजल इत्यादींविषयी अध्यात्म आणि विज्ञान भाविकांना पहायला मिळणार !

दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना डावीकडून सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. गौरीशंकर मोहाता आणि श्री. कृष्णा मांडवा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभ मेळा, विविध धार्मिक कृती, परंपरा, विधी, उपासना, गंगाजल, तीर्थक्षेत्र, तसेच संगीत, नृत्य आदींमागे किती मोठे विज्ञान आहे ? हे दर्शवणारे अद्वितीय प्रदर्शन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात लावण्यात आले आहे. या कुंभमेळ्यातील विविध धार्मिक कृतींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या (‘एम्.ए.व्ही.’च्या) वतीने वैज्ञानिक संशोधनही करण्यात येणार आहे. यामुळे प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्रतम त्रिवेणी संगमावर आता अध्यात्म अन् विज्ञान यांचा अनोखा संगम पहाण्याची संधी भाविकांना लाभणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले. या पत्रकार परिषदेला विश्वविद्यालयाचे श्री. कृष्णा मांडवा, कु. ज्योत्सना गांधी आणि सुजाता ठक्कर यांनी संबोधित केले. या वेळी वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्यात विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचे निष्कर्षही सर्वांसमोर मांडण्यात आले. ज्यामध्ये अमृतस्नानाच्या वेळी संगमाच्या पाण्यात विशेष आध्यात्मिक गुण आढळल्याची माहिती देण्यात आली.

डावीकडून श्री. कृष्णा मांडवा, कु. ज्योत्सना गांधी आणि सुजाता ठक्कर

या वेळी श्री. कृष्णा मांडवा यांनी सांगितले की, अमृत स्नानाच्या वेळी गंगाजलाचा सकारात्मक प्रभाव, त्रिवेणी संगमाच्या जलाचे आध्यात्मिक कंपन आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांवर आधारित विशेष संशोधन व्हिडिओ प्रदर्शनात दाखवले जातील. ‘एम्.ए.व्ही.’च्या संगीत आणि नृत्य विभागाने ७०० हून अधिक प्रयोग केले आहेत. भक्तीभावयुक्त कथक नृत्याचे विशेष व्हिडिओ प्रदर्शनात सादर करण्यात येतील. २० वर्षांपासून एक्झिमा (त्वचारोग) या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने नामस्मरणाद्वारे त्याचा आजार बरा केला, याचेही उदाहरण प्रदर्शनात सादर करण्यात येईल.

या वेळी सुजाता ठक्कर म्हणाल्या की, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केली. विश्वविद्यालयाचे ध्येय ऋग्वेदातील प्रसिद्ध श्लोक ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (अर्थ : संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.)  यानुसार प्रेरित आहे. विश्वविद्यालयाचा उद्देश साधना, सनातन वैदिक धर्म आणि भारतीय ज्ञानप्रणाली यांचा प्रसार करून मानव जीवन सात्त्विक अन् सकारात्मक बनवणे आहे. आध्यात्मिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की, भारतीय संस्कृतीतील प्रत्येक घटक उच्च सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करण्यासाठी सिद्ध केला आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ‘महाकुंभ २०२५’मधील विशेष उपक्रम

‘महाकुंभ २०२५’च्या कालावधीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ित्रवेणी संगमावर आध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मकतेवर सखोल संशोधन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत.

१. अमृत स्नानाचा प्रभाव : स्नानापूर्वी आणि स्नानानंतर भाविकांवर होणार्‍या आध्यात्मिक परिणामांचे अध्ययन

२. पाणी, माती आणि हवा यांचे परीक्षण : पौष पौर्णिमेपासून महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळ्यातील परीक्षण

३. कल्पवासाचे महत्त्व : कल्पवासादरम्यान भाविक आणि पर्यावरण यांवर होणार्‍या परिणामांचे अध्ययन

४. अक्षयवटाचे अध्ययन : कुंभमेळ्याच्या कालावधीत त्याच्या आध्यात्मिक परिणामांचे विश्लेषण केले जाणार आहे.

  • प्रदर्शनाचे उद्घाटन गीता भवन, ऋषिकेश (उत्तराखंड) येथील श्री. गौरीशंकर मोहाता, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. कृष्णा मांडवा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
  • प्रयागराज कुंभमेळ्यातील कैलाशपुरी मार्ग, कला कुंभच्या समोर, सेक्टर ७ येथे हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चालू रहाणार आहे.

संपादकीय भूमिका

अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही विषय वेगवेगळे असले, तरी त्यांचा अनोखा संगम होणे हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्वच !