Indian Navy Advanced Warships : ‘आय.एन्.एस्. सूरत’, ‘आय.एन्.एस्. निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आय.एन्.एस्.’ वाघशीर पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल !

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, १५ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी नौदलाला नवी शक्ती आणि दृष्टी दिली होती. त्यांच्या या पवित्र भूमीवर आज आम्ही एकविसाव्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत. या शतकातील भारताची सैनिकी क्षमताही अधिक सक्षम आणि आधुनिक असावी, हे देशाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. जल, भूमी किंवा आकाश असो, समुद्राची खोली असो कि अमर्याद जागा असो, भारत सर्वत्र आपले हित जपत आहे. त्यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत ‘आय.एन्.एस्. सूरत’, ‘आय.एन्.एस्. निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आय.एन्.एस्.’ वाघशीर या पाणबुडीचे १५ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजानाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलासाठी हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा, असा आहे. एकाच दिवशी २ युद्धनौका आणि १ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले…

१. आज संपूर्ण जगात भारत एक विश्‍वासार्ह आणि उत्तरदायी भागीदार म्हणून ओळखला जात आहे. भारत विस्तारवादाच्या भावनेने नव्हे, तर विकासाच्या भावनेने काम करत आहे.

२. आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ अनेक मोठे निर्णय घेऊन चालू झाला आहे. देशाच्या आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही नवीन धोरणे वेगाने सिद्ध केली आहेत. आम्ही नवीन कामे चालू केली आहेत.

३. देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍याचा आणि प्रत्येक क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने आम्ही पुढे जात आहोत. किनारी सागरी क्षेत्रे, जलवाहतुकीचे स्वातंत्र्य आणि सुरक्षित व्यापार पुरवठा मार्ग अन् सागरी मार्गांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

४. अमली पदार्थ, शस्त्रे आणि आतंकवाद यांपासून महासागरांचे संरक्षण करण्यासाठी अन् त्यांना सुरक्षित, तसेच समृद्ध करण्यासाठी आपण जागतिक भागीदार बनले पाहिजे. यासाठी आम्ही प्रभावीपणे प्रयत्न करत आहोत.

५. जागतिक सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय परिदृश्य सिद्ध करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या युद्धनौकांचे वैशिष्ट्य

‘आय.एन्.एस्. सूरत’

आय.एन्.एस्. सूरत

गुजरात राज्याच्या एका शहराचे नाव या युद्धनौकेला देण्यात आले आहे. या युद्धनौकेची लांबी १६४ मीटर असून रुंदी १८ मीटर, तर वजन ७ सहस्र ६०० टन इतके आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, बराक क्षेपणास्त्र, पाणबुड्या विरोधी रॉकेट लाँचर आणि विशेष भारतीय बनावटीच्या बंदुका आहेत.

‘आय.एन्.एस्. निलगिरी’

‘आय.एन्.एस्. निलगिरी’

या युद्धनौकेवर शत्रूशी लढण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये प्रामुख्याने ८ ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत, तसेच ३२ बराक क्षेपणास्त्रे असून ती आकाशातील लक्ष्यावर मारा करण्यासाठी सिद्ध आहेत. तसेच यावर पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर असून ते पाण्यातून मारा करण्यासाठी सिद्ध आहेत. युद्धनौकेचा वेग २८ नॉटिकल प्रति घंटा आहे, तर तिचे वजन ६ सहस्र ६७० टन असून लांबी १४९ मीटर इतकी आहे. शत्रूच्या रडारमध्ये टिपली जाऊ नये, यासाठी अनेक उपकरणांनी ही युद्धनौका सज्ज आहे.

‘आय.एन्.एस्.’ वाघशीर पाणबुडी !

आय.एन्.एस्.’ वाघशीर

भारतीय नौदलातील ‘आय.एन्.एस्.’ वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट ७५ च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. वर्ष २०२२ मध्ये जलावतरण झाल्यानंतर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ती भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, तर उंची १२.३ मीटर आहे. ही खोलवर समुद्रात जाऊ शकते आणि शत्रूशी दोन हात करू शकते. ४५ ते ५० दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करू शकते.

मुंबई येथील ‘माझगाव डॉक शिपबिल्डर’च्या गोदीने दोन्ही युद्धनौका आणि पाणबुडी यांची निर्मिती करून ‘आत्मनिर्भर भारत’ या भारत सरकारच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.