‘आपत्काळात वेदनांना तोंड कसे द्यायचे ?’, हे शिकवणारी एक आदर्श साधिका !

साधिकेला दाढदुखीच्या वेदना होत असतांना आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवाने तिच्याकडून करवून घेतलेला एक छोटासा प्रयोग ! 

कु. तृप्ती कुलकर्णी

‘एकदा मध्यरात्री ३ वाजता माझ्या उजव्या दाढेत जोरात कळ येऊन मला जाग आली. तेव्हा माझ्या मनात वेदनाशामक गोळी घेण्याचा विचार आला; पण देवाने मला गोळी न घेता वेदना सहन करण्यास सांगितले. त्यामुळे मी वेदनांकडे दुर्लक्ष करत नामजप आणि भावप्रयोग करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे मध्यम स्वरूपातील वेदनेचे रूपांतर मंद वेदनेत झाले, तरीही त्या वेदना मला सहन होत नव्हत्या. अशा स्थितीत जवळजवळ १० – १५ मिनिटे गेल्यावर मी देवाला ‘आता मला वेदना सहन होत नाहीत’, असे सांगितले. तेव्हा देवाने मला मानस रूपात वेदनाशामक गोळी घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी वेदनाशामक गोळी घेण्याची मानस कृती केल्यावर ५ मिनिटांतच मला जणू खरंच वेदनाशामक गोळी घेतल्याप्रमाणे वेदना कमी होऊन गाढ झोप लागली. त्यानंतर नेहमीप्रमाणे मी सकाळी ७ वाजताच जागी झाले. तेव्हाही मला मंद स्वरूपाच्या वेदना होतच होत्या; पण देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले. तेव्हा मला ‘आपत्काळात वेदना होत असतांना औषधे न मिळाल्यास माझी साधना कशी होणार ?’, याची काळजी वाटली. त्यामुळे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच मला मध्यरात्री ३ ते दुसर्‍या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत, म्हणजे एकूण १३ घंटे वेदना सहन करण्याची शक्ती दिली. माझ्या आयुष्यात प्रथमच मी एवढे घंटे वेदना सहन केल्या असतील. मंद स्वरूपातील वेदना पूर्णपणे थांबण्यासाठी दुपारी ४ वाजता मात्र मी स्थुलातून वेदनाशामक गोळी घेतली.

या वेदनांमुळे मला होणारा आध्यात्मिक त्रासही वाढला. अशा स्थितीत वेदना सहन करणे, म्हणजे एक अग्निदिव्यच होते; पण ‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच माझ्याकडून हा प्रयोग करवून घेऊन मला वेदना सहन करण्याची शक्ती दिली’, असे मला वाटले. या प्रसंगातून मला आपत्काळाची थोडीशी कल्पना आली.’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक