
पुष्कळ मंडळी जमली होती. त्या सर्वांशी बोलणे होऊन श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) थांबतात. तेवढ्यात एक गृहस्थ तेथे पोचले आणि झटकन पुढे होऊन त्यांनी पायावर डोके ठेवले. त्यांना काही बोलण्याचा अवसर न देताच श्रीमहाराजांनी स्वतःच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, ‘एक वैद्य होता. त्याच्याकडे पुष्कळ रोगी येत. औषधांनी भरलेल्या बाटल्या त्याच्या कपाटात होत्या. त्यातून ज्याला जे योग्य ते औषध तो काढून देई. एके दिवशी त्यांच्या मुलालाच बरे वाटत नव्हते. तेव्हा वैद्याने मुलाला हाक मारून सुंठेची पूड त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, ‘ही खाऊन टाक.’ तसे आतापर्यंत पुष्कळांना पुष्कळ सांगितले. तुम्हाला थोडक्यात सांगतो, ‘रामनाम घ्या, त्यात सारे काही आले.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)