द्रष्ट्या संतांचे आज्ञापालन करतांना ‘आपण एक पाऊल उचलले की, देव १० पावले पुढे येतो’, याची साधकाला येत असलेली प्रचीती !

१. द्रष्टे संत आणि ऋषिमुनी यांनी आपत्काळाच्या भीषणतेविषयी सांगितलेले वाचून ‘अधिकोषातील पैसे काढून घ्यायला हवेत’, असे वाटणे

‘अनेक द्रष्टे संत आणि ऋषिमुनी यांनी आताच्या आपत्काळाविषयी वेळोवेळी सांगून ठेवले आहे, ‘आपत्काळात युद्धजन्य स्थितीत सर्वच जनजीवन विस्कळीत होईल !’ आपत्काळाच्या भीषणतेविषयी समजल्यावर माझ्या मनात आले, ‘युद्धजन्य स्थितीत सर्वांत आधी अधिकोषातील आपल्या खात्यातून पैसे काढायला मर्यादा येतील आणि आपलेच पैसे आपल्याला वापरता येणार नाहीत. तिसर्‍या महायुद्धाची तीव्रता इतकी भीषण आहे की, अधिकोषसुद्धा बुडतील !’ ‘त्यामुळे भविष्याचा विचार करून आपण अधिकोषातील आपले पैसे काढून घ्यायला हवेत’, असे मला वाटू लागले. द्रष्टे संत मानवाच्या भल्यासाठीच सर्व सांगत असतात.

२. अधिकोषातील पैसे काढण्याविषयी मनात संभ्रम निर्माण होणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प.पू. भक्तराज महाराज यांचे सुवचन वाचून मनातील संभ्रम दूर होणे

तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मी अधिकोषातील सगळेच पैसे काढले, तर त्यातील रकमेवर येणारे व्याज पूर्णपणे बंद होईल, तर मग घरखर्च चालेल ना ?’ त्या वेळी मनात संभ्रम होता; पण ‘द्रष्ट्या संतांवर श्रद्धा ठेवून आज्ञापालन करायचे. देव काळजी घेईलच’, असा विचार केला. दुसर्‍याच दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘नामस्मरण’ हे अधिकोषात ठेवलेल्या धनाप्रमाणे आहे आणि वेळप्रसंगी तेच उपयोगी पडते’, हे सुवचन माझ्या वाचनात आले. त्या वेळी माझ्या मनाचा होत असलेला संघर्ष पूर्णतः थांबला. ‘देवानेच योग्य विचार कृतीत आणावा, यासाठी हे सुवचन छापले असणार’, असे मला वाटले आणि मी लगेच अधिकोषातून पैसे काढण्याची कृती केली.

३. काही जणांनी विचारलेल्या प्रश्नांना देवाच्या कृपेने शांत राहून उत्तरे देता येणे

मी अधिकोषातून पैसे काढल्याविषयी काही जणांना समजले. त्यांनी साशंकतेने मला काही प्रश्न विचारले. त्या वेळी देवाच्या कृपेने मला सगळ्यांना शांतपणे आणि स्थिर राहून सांगता आले, ‘‘देवाने द्रष्ट्या संतांच्या माध्यमातून आपल्याला जागे केले आहे. अधिकोषातून मिळणार्‍या थोड्याशा व्याजासाठी ‘संतांनी लक्षात आणून दिले त्यावर श्रद्धा ठेवायची कि नाही’, याचा विचार तुम्हीच करा. अधिकोष बंद झाले, तर तुमचे मुद्दल आणि व्याज दोन्ही जाईल; पण श्रद्धा ठेवली, तर देव नक्कीच तुमची काळजी घेईल !’’

४. देवावर श्रद्धा ठेवून केलेल्या कृतीला पुष्टी देणारी महाभारतातील एक घटना वाचनात येणे

त्याच कालावधीत ‘भगवंताचे आज्ञापालन आणि त्याची शिकवण’ या संदर्भातील एक उदाहरण माझ्या वाचनात आले,‘ कंसाचे सासरे जरासंध याने कंसाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी श्रीकृष्णाच्या मथुरेवर १८ वेळा आक्रमण केले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी श्रीकृष्णाला मथुरावासियांसह मथुरा येथून द्वारका येथे जावे लागले. त्या वेळी श्रीकृष्णाने सर्वांना सांगितले, ‘‘तुम्ही आहात, तसेच द्वारकेला चला. मी तुमची सोय करतो.’’ त्या वेळी काही जणांनी कपडे, घरातील काही वस्तू आदी साहित्य समवेत घेतले, तर काही जणांनी भगवंताच्या आज्ञेनुसार समवेत काही न घेता नेसत्या वस्त्रानिशी मथुरा सोडली. सर्व जण द्वारकेला गेल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार जे नेसत्या वस्त्रानिशी आले होते, त्यांना मथुरेतील त्यांच्या रहात्या घरासारखे घर आणि त्यातील सर्व गोष्टी आहे तशा मिळाल्या, तर जे समवेत काही सामान घेऊन आले होते, त्यांना जे त्यांनी समवेत आणले होते तेवढेच मिळाले.

५. देवाची अनुभवलेली कृपा !

काही प्रसंगांत देवाने अशीच माझी काळजी घेतल्याचे मला अनुभवताही आले.

५ अ. कोरोना महामारीच्या कालावधीत खासगी चारचाकी गाडीने नातेवाइकांकडे गेल्यावर त्यांनी दिवाळीची भेट म्हणून पैसे देणे आणि ती रक्कम जाण्या-येण्याच्या प्रवासाच्या खर्चाएवढीच असणे : एकदा कोरोना महामारीच्या कालावधीत दिवाळीच्या दिवसांत मला बाहेरगावी एका नातेवाइकांना भेटायला जायचे होते. तेव्हा सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे सोयीचे नव्हते. त्यामुळे मी खासगी चारचाकी गाडीने नातेवाइकांकडे गेलो. त्या वेळी माझा जाण्या-येण्याचा जेवढा खर्च झाला, तितक्याच रकमेचे पैशाचे पाकीट त्या नातेवाइकांनी मला दिवाळीची भेट म्हणून दिले. मी अनेक वर्षे त्या नातेवाइकांकडे जात आहे; पण त्यांनी मला कधीही दिवाळीच्या दिवसांत किंवा अन्य गोष्टीसाठी पैसे दिले नव्हते. देवानेच त्यांना मला पैसे देण्याविषयी सुचवले आणि मला साहाय्य केले.

५ आ. सेवेसाठी बाहेर गेल्यावर ‘दुचाकी गाडीत पेट्रोल नाही’, असे लक्षात येणे आणि एक वस्तूही खरेदी करायची असणे, अकस्मात् नातेवाइकांची भेट होऊन त्यांनी एका कामाचे पैसे देणे, प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे येणे शेष नसणे : एकदा मी सेवेसाठी बाहेर गेलो होतो. त्या वेळी ‘दुचाकी गाडीत पेट्रोल नाही’, असे माझ्या लक्षात आले. त्याच वेळी घरून माझ्या पत्नीने भ्रमणभाष करून घरातील एक साहित्य आणायला सांगितले. त्या वेळी माझ्या खिशात केवळ १० रुपये होते. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला, ‘आता कसे करायचे ?’

तेव्हा अकस्मात् मला आमचे एक नातेवाईक भेटले. ते मला म्हणाले, ‘‘तू काही मासांपूर्वी माझे एक काम केले होतेस. त्याचे पैसे मी तुला द्यायला विसरलो होतो.’’ प्रत्यक्षात असे कोणत्या कामाचे पैसे त्यांनी मला द्यायचे शेष नव्हते. गाडीसाठी आवश्यक असलेले पेट्रोल आणि घरासाठी लागणारी वस्तू यांना लागणार्‍या पैशांएवढेच ते पैसे होते. त्या वेळी ‘मला श्रीकृष्णाचे  ‘माझ्या दिशेने पाऊल उचलून तर बघ, नाही तुझ्यावर लक्ष ठेवले तर सांग’, हे वचन आठवले आणि माझ्या मनात ‘देवाने माझ्यासाठी किती करावे !’, असा विचार येऊन माझी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

५ इ. शाळेत पारितोषिक म्हणून मिळालेले पैसे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण करणे, त्यांनी त्यातील काही रक्कम खाऊसाठी परत देणे आणि प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांच्या सांगण्यानुसार ते पैसे जपून ठेवणे अन् त्या पैशांचे महत्त्व लक्षात येणे : वर्ष १९९३ ते १९९५ या कालावधीत मला शाळेत पारितोषिक म्हणून काही पैसे मिळाले होते. प.पू. विमल फडकेआजी यांनी आम्हाला अर्पणाचे महत्त्व सांगितले होते. मी पारितोषिक म्हणून मिळालेले पैसे सनातन संस्थेच्या कार्याला अर्पण म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले. त्या वेळी त्यांनी त्यातील ५० रुपयांच्या दोन नोटा मला खाऊ घेण्यासाठी म्हणून परत दिल्या होत्या. तेव्हा प.पू. विमल फडकेआजी यांनी सांगितल्यानुसार त्यातील ५० रुपये मी खाऊसाठी खर्च केले आणि १ नोट जपून ठेवली. त्या वेळी त्या मला म्हणाल्या होत्या, ‘‘तुला पैशांची कितीही अडचण आल्यास काहीही झाले, तरीही तू हे पैसे वापरू नकोस. संतांनी तुला हे पैसे दिले असल्याने ते जपून ठेव. तुला कधीच काही न्यून पडणार नाही.’’ त्या वेळी मला त्यांचे बोलणे कळले नव्हते; पण मी ती नोट कधीही वापरली नाही. खरेच आज मला त्या नोटेचे महत्त्व कळत आहे.

६. कृतज्ञता

देव सर्वच माध्यमांतून माझी काळजी घेत आहे. मी देवाप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.

‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्यात गुर्वाज्ञापालन करण्याची क्षमता निर्माण करून माझ्याकडून आवश्यक ते प्रयत्न करून घेतले आणि वेळोवेळी अलौकिक अनुभूतीही दिल्या. ‘आपण एक पाऊल उचलले की, देव १० पावले पुढे येतो’, याची मला अनेक प्रसंगांतून प्रचीतीही आली. तुमच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– एक साधक (२२.११.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक