बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात चर्चा आता देशभरच होत आहे. अनेक राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ या समस्येविषयी जागृती करत आहेत. या विषयावर अनेक परिषदा, चर्चासत्रे होत आहेत. बांगलादेशी घुसखोरांनी भारताच्या विविध क्षेत्रांत केलेला शिरकाव पहाता त्यांना देशाबाहेर घालवणे नक्कीच आव्हानात्मक आहे.

१. अनेक क्षेत्रांत, अनेक प्रांतात घुसखोरी
महाराष्ट्रापुरता विचार केला, तर बांधकाम क्षेत्रात तर आता बांगलादेशी कामगारांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. राज्यात शासनाकडून अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांच्या ठिकाणी बांगलादेशी कामगार काम करत आहेत. बांगलादेशी फेरीवाल्यांविना तर आता खरेदीच होऊ शकत नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. सिग्नलवर वस्तू विकणारे, वेगवेगळ्या सुरक्षा पुरवणार्या ठेकेदारांकडे, तसेच जिथे भरपूर वेळ देऊन किंवा कष्टाचे काम करावे लागते, तिथे मोठ्या शहरांत घरकामासाठी येणार्या मदतनीस, दुर्गम भागांतील हॉटेलमध्ये सर्व प्रकारची कामे करणारे, विविध शहरांतील कचरावेचक हे सगळे बांगलादेशी धर्मांध असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरी भागासह कोकणातही आता बांगलादेशी, नेपाळी लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. कोकणात मासेमारी करणे, रेती काढणे, नारळ काढणे हेही आता बांगलादेशी करू लागले आहेत. थोडक्यात केवळ एका क्षेत्रात नाही, तर दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे.
२. बांगलादेशी घुसखोरांचे प्रकार

भारतातील घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची चर्चा होते, तेव्हा बेकायदेशीररित्या रहाणार्या बांगलादेशींचा शोध चालू होतो. याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) सांगतात की, भारतात आढळणार्या बांगलादेशी घुसखोरांचे ४ प्रकार आढळतात. सीमावर्ती भागातील भारतीय हद्दीत बांगलादेशी घुसखोर प्रतिदिन येतात. ते त्या भागात भारतात रिक्शा चालवायला येतात. सकाळी येतात आणि दिवसभर धंदा करून संध्याकाळी परत जातात. मेघालय, त्रिपुरा, अगरताळा या भागातही हा प्रकार आढळतो.
भारतात रहाणार्या ७० टक्के बांगलादेशी घुसखोरांकडे भारताचे आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे आहेत. भलेही ती बोगस (खोटे) पुरावे दाखवून किंवा भ्रष्टाचाराने मिळालेली असतील; परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यामुळे अशा बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना बांगलादेशात परत पाठवणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे. काही बांगलादेशींकडे भारतीय कागदपत्रे नाहीत, असे बांगलादेशी मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांना देशाबाहेर घालवणे शक्य होते. काही बांगलादेशींनी भारतात रहाण्यासाठी त्यांची नावे पालटली आहेत. त्यांच्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र असते, त्या कुंकूही लावतात. त्यामुळे त्यांनाही ओळखणे कठीण आहे.
३. बांगलादेशी घुसखोरांना स्थानिकांचेच साहाय्य
आज भारतात ५-६ कोटी घुसखोर आहेत. भारतातील प्रशासकीय कामकाजातील प्रचंड घुसखोरीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे, तसेच अजूनही घुसखोरी चालूच आहे. एका बांगलादेशी घुसखोर मुसलमानाला भारतीय व्यवस्थेत घुसवण्यासाठी ३०-३५ जण साहाय्य करतात. यातील अनेकांना ते बांगलादेशी घुसखोराला साहाय्य करत आहेत, याची जाणीवही असते. असे असले, तरी केवळ आर्थिक लाभासाठी असे देशविघातक कृत्य केले जाते. या बांगलादेशींना कोलकाता येथे २ दिवस भारतीय व्यवस्थेत घुसण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ज्या भागात त्यांच्या नोकरी-धंद्याची सोय केली आहे, तिथे पोचवले जाते. त्यामुळे केवळ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून चालणार नाही, तर त्यांना भारतात कोण साहाय्य करत आहे, त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास घुसखोरांचे लोंढे रोखण्याच्या प्रक्रियेला गती येईल.
४. कागदपत्रे मिळवलेल्यांचे काय ?
७० टक्के बांगलादेशी घुसखोरांकडे भारताचे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे आहेत. याचा अर्थ देशाच्या सुरक्षेचे मोल मोजून प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालू आहे. ज्यांच्याकडे रहिवासी दाखला नसतो, त्यांना अधिकोषाचे खाते उघडून देण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी स्थानिक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांचा दाखला हेच रहिवासी प्रमाणपत्र म्हणून दाखवण्याची मुभा असते. धर्मांधबहुल भागातील लोकप्रतिनिधींनी एकगठ्ठा मतांसाठी अशा सहस्रो लोकांसाठी दाखले दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशांना आपल्या प्रांतातील बांगलादेशी घुसखोरांची माहिती देण्याची इच्छा नसते. आधीच अधिकृत कागदपत्रे सिद्ध झालेली असतात, त्यात स्थानिकांकडून काही माहिती मिळाली नाही, तर पोलीसदलही हतबल होते.
ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे, त्यांना त्यांच्या देशाबाहेर हुसकावणे कठीणच आहे. अशा वेळी शासनजमा असलेली वंशावळ सादर करण्याचे आदेश दिल्यास ते भारतीय नागरिकच आहेत कि बांगलादेशी किंवा अन्य कोणत्या देशातील घुसखोर आहेत, हे सहजतेने ओळखता येईल.
५. बांगलादेशी घुसखोर धर्मांधांना हुसकावण्यासाठी ‘कोंबिंग ऑपरेशन’ (गुन्हेगारांना शोधण्यासाठी राबवलेली शोधमोहिम) करा !
अशा स्थितीत बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी पोलीस प्रशासनाला बळ देऊन देशभरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ हाती घेणे आवश्यक आहे. देशात निर्माण होणारे अनेक स्तरावरील रोजगार, पायाभूत सुविधा यांचा लाभ भारतीय नव्हे, तर हे बांगलादेशी घुसखोर धर्मांध घेत आहेत. ठिकठिकाणी झोपडपट्ट्या निर्माण करून शहरे बकाल करत आहेत. विशेष म्हणजे मुख्य प्रवाहातील माध्यमे या वाढत्या समस्येविषयी बोलायला सिद्ध नाहीत. ठराविक नेते सोडता कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यप्रणालीवर बांगलादेशी घुसखोरांना हाकलणे, हा मुद्दा नाही. त्यांनी काबिज केलेल्या बाजारपेठा आणि उद्योग व्यवसाय भारतियांना मिळावेत, अशी कुणाची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे आता जनतेनेच आपल्या प्रांतात रहायला येणार्यांकडे लक्ष ठेवून पोलिसांना त्यांची तात्काळ माहिती देणे आवश्यक आहे. जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल हे निश्चित !
– सौ. सायली लुकतुके, विरार, पालघर.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, मराठी, ८.१.२०२५)