…आणि हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला !

आज राजमाता जिजाऊ जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…

राजमाता जिजाऊ

जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. दोन तेजस्वी जीव एकत्र आले; पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. अखेर त्यांनी भवानीमातेलाच साकडे घातले. ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, असे म्हणून पदर पसरला. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान, स्थिरता, रयतेचे कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणार्‍या किती माता या समाजात असतील देव जाणे; पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणार्‍या दैत्यांचा नि:पात झाला.

भवानी आईला जिजाऊंचे हे मागणे पूर्ण करणे भाग होते; कारण जे दु:ख जिजाऊंचे होते तेच दु:ख भवानीमातेचे होते. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरे पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या आवश्यकता, लक्ष्य आणि स्वप्न एक होते. या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला अन् शिवजन्मासह हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला.

‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी छत्रपती शिवराय यांना दिलेली शिकवण होती. त्यासह ‘आपण, समाज, तू आणि मीही पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर त्यांना दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव मार्ग, म्हणजे स्वराज्य स्थापन करणे, ही छत्रपती शिवराय यांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच !

(साभार : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)