सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. शब्दांच्या स्तरावर शिकायला मिळालेल्या सूत्रांना नव्हे, तर संतांचा प्रत्यक्ष सत्संग मिळाल्यावर आलेल्या अनुभूतींना अध्यात्मात महत्त्व असते !

योगिता घाटे

योगिता घाटे : ‘आज सकाळी देवाला, म्हणजे तुम्हालाच प्रार्थना केली, ‘परम पूज्य, मला कळत नाही की, या सत्संगाचा मी आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ करून घेऊ ? म्हणजे तुमचाही वेळ जायला नको.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शब्दांच्या स्तरावर शिकायला मिळालेल्या सूत्रांना अध्यात्मात विशेष महत्त्व नसते. शब्दांच्या स्तरावरील सर्व ग्रंथांत लिहिलेले असते; पण संतांना भेटल्यावर अनुभूती आली, तर ती महत्त्वाची ! जेव्हा आपण देवळात जातो, तेव्हा देव आपल्याशी बोलतो का ?; पण मूर्तीला पाहून नमस्कार केल्यावर स्पंदने जाणवतात. ते महत्त्वाचे असते.

२. देवघरातील देवतांचे तत्त्व ज्या दिशेने जाणे आवश्यक असते, त्या दिशेला त्या देवतांच्या मूर्ती वळतात !

योगिता घाटे : परम पूज्य, आमच्या घरच्या देवघरातील देवांची मांडणी प्रतिदिन पालटलेली असते. रात्री देवघरातील मूर्तींच्या दिशा वेगळ्या असतात आणि सकाळी उठल्यावर पाहिले, तर मूर्ती फिरलेल्या असतात. असे पुष्कळ दिवसांपासून आपोआप होत आहे. त्याचे कारण मला कळत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मूर्ती फिरतात, म्हणजे ज्या दिशेने त्या देवतेचे तत्त्व जाणे आवश्यक असते, त्या दिशेला आपल्याला साहाय्य करण्यासाठी मूर्ती वळतात. छान आहे ! हे तुमच्या साधनेमुळे होत आहे.

३. ‘भावावस्थेत रहाणे आणि सेवा करणे’, हे दोन्ही महत्त्वाचे आहे !

योगिता घाटे : भावावस्था अखंड टिकून रहाण्यासाठी मी आणखी काय प्रयत्न करू ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : भावावस्था अखंड टिकून रहायला नको; कारण तुम्ही समष्टी सेवाही करता ना ! भावावस्था अखंड टिकून राहिल्यास समष्टी सेवा होणारच नाही. ‘भावावस्थेत रहाणे आणि सेवा करणे’, हे दोन्ही महत्त्वाचे आहे.’