प्रयागराज, १२ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभनगरी मोठ्या प्रमाणात मंडप, तंबू आणि लाकडी साहित्य वापरून विविध रचना उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे आग लागण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन अग्नीप्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आग लागल्यास ती त्वरित विझवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कुंभक्षेत्रात २२० अग्नीशमन स्थानकांची उभारणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अत्याधुनिक ‘एटीव्ही’ वाहने आणि ‘फायर रोबोट’ यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एटीव्ही वाहने म्हणजे काय ?
गंगेच्या पात्रात होणार्या कुंभमेळ्यात प्रशासनाने लोखंडी प्लेट वापरून रस्ते बनवले असले, तरी या रस्त्यांवर वाळू वारंवार जमा होत असल्याने आणि पाण्यामुळे चिखलही होत असल्याने येथून दुचाकी जातांना त्या घसरण्याचा धोका असतो. काही रस्ते निमुळते असल्यामुळे तेथे आग प्रतिबंधक चारचाकी वाहन जाणे कठीण असते. अशा वेळी या वालुकामय प्रदेशात वेगाने जाता यावे, यासाठी अत्याधुनिक एटीव्ही वाहने (ऑल टेरेन फायर फाईटींग व्हेइकल) आणली आहेत. ही वाहने वाळू आणि चिखल यांमधून सहजतेने जाऊन आगीच्या ठिकाणी पोचून आग विझवू शकतात. या वाहनांवर अग्नीरोधक उपकरणे, पाण्याचे टँक, पंप, एअर कॉम्प्रेसर, आग विझवणारे यंत्र असून पाण्यासह फोमचा मारा करण्यास ही वाहने सक्षम आहेत. ही वाहने जर्मनी येथून मागवली असून त्यांचे मूल्य प्रत्येकी अडीच कोटी रुपये आहे. ही वाहने चालवण्यासाठी अग्नीशमन विभागातील सैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.
आग प्रतिबंधक यंत्रमानव !
कुंभमेळ्यात एटीवी वाहनांसह पहिल्यांदाच आग प्रतिबंधक यंत्रमानवही कार्यरत करण्यात आले आहेत. छोट्या आकारातील हे यंत्रमानव विशेष प्रशिक्षण घेतलेल्या अग्नीशमन अधिकार्यांकडून चालवले जाणार आहेत. हे यंत्रमानवही दुर्गम भागांत जाऊन आग विझवण्याचे काम करू शकतात.