|
प्रयागराज, १२ जानेवारी (वार्ता.) – तीर्थराज प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगम तटावर १३ जानेवारीपासून महाकुंभपर्वास आरंभ होणार आहे. १३ जानेवारीला महाकुंभमेळ्यातील पहिले स्नान, तर १४ जानेवारीला पहिले अमृत स्नान होणार आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या महाकुंभपर्वात भारतातील सर्व १३ आखाड्यांचे साधू-संत, आचार्य महामंडलेश्वर, महामंडलेश्वर, महंत आदींसह देशविदेशातून असंख्य साधू-संत सहभागी होणार आहेत. सर्व १३ आखाड्यांची पेशवाई अर्थात् नगरप्रवेश झाला आहे. यंदाचा महाकुंभमेळा असल्याने साधू-संतांसह समस्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा महाकुंभमेळा जगातील सर्वांत मोठा सोहळा असल्याने पोलीस आणि प्रशासन यांनी भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रयागराज नगरी सजली !
महाकुंभमेळ्यानिमित्त संपूर्ण प्रयागराज सजले आहे. शहराच्या, तसेच कुंभक्षेत्राच्या सर्व प्रवेशाद्वारांवर मोठ्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणेही सजवण्यात आली आहेत. सर्वत्र दिशादर्शक कमानी लावण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व भिंतींवर हिंदूंच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा दर्शवणारी रंगवण्यात आलेली चित्रे, हे यंदाच्या महाकुंभपर्वाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. महामार्गावरील, तसेच शहरातील सर्व वीजेच्या खांबांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून प्रत्येक खाबांवर शंख, चक्र, स्वस्तिक आदी शुभचिन्हे लावण्यात आली आहेत.
अशी आहे भव्य-दिव्य महाकुंभपर्वाची भव्य-दिव्य सिद्धता !१. संगम तटावर २० कि.मी. क्षेत्रात वसला आहे मेळा ! २. २५ सेक्टरांची निर्मिती, त्यात अनुमाने दीड लाख छावण्यांची उभारणी ! ३. भाविकांच्या स्नानासाठी संगम तटावर १२ कि.मी. क्षेत्रात १५ घाटांची निर्मिती ! ४. अमृत स्नानासाठी (शाही स्नानासाठी) दश्वाश्वमेध घाट, सरस्वती घाट, महेवाघाट यांसह साथ ७ पक्क्या घाटांची (३ गंगा नदी आणि ४ यमुना नदीवर) निर्मिती ! ५. गंगा-यमुना नदीवरून ये-जा करण्यासाठी ३० पंटून पुलांची निर्मिती ! ६. सर्व ‘मोबाईल सर्व्हिस प्रोवायडर्स’चे ८० ‘मोबाईल टॉवर्स’ची उभारणी ! ७. संपूर्ण कुंभक्षेत्री जवळजवळ ६७ सहस्र पथदिवे ! ८. ५ लाख वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था ! ९. ५० ‘फायर स्टेशन’ची निर्मिती ! १०. दीड लाखांहून अधिक शौचालयांची बांधणी ! ११. १० सहस्र अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त ! |
अमृत आणि पर्व स्नानाचे दिनांक
|
यंदाच्या कुंभपर्वापासून ‘शाही स्नान’ला ‘अमृत स्नान’ संबोधणार !
‘शाही स्नान’ हा शब्द मोगल काळापासून वापरण्यात येऊ लागला होता. हे गुलामगिरीच प्रतीक असल्याचे सांगत यंदाच्या कुंभपर्वापासून ‘शाही स्नाना’ला ‘अमृत स्नान’ असे संबोधण्याचा निर्णय आखाडा परिषदेने काही माहिन्यांपूर्वी घेतला होता. यास प्रयागराज येथील यंदाच्या महाकुंभपर्वापासून आरंभ झाला आहे.
पोलिसांकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था !
|
प्रयागराज – यंदाच्या महाकुंभपर्वासाठी ४० कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनीही संपूर्ण कुंभपर्वाच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. पोलिसांनी महाकुंभपर्वासाठी ७ पदरी सुरक्षाव्यवस्था ठेवली असून तब्बल ६० सहस्र पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात १३ तात्पुरती पोलीस ठाणी, २३ पोलीस चौक्या, तसेच ८ झोन आणि १८ सेक्टर यांची निर्मिती करण्यात आली आहे. यासह निमलष्करी दल, सशस्त्र पोलीस दल, बाँबशोधक आणि नाशक पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आदी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. बस स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ येथून कुंभक्षेत्री येणार्या भाविकांसाठी पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय प्रवशांची पडताळणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासह ए.आय. आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि अँटीड्रोन यंत्रणा आदींचाही वापर करण्यात येणार आहे. सामाजिक माध्यमांचा वापर करणार्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे.
असा असेल फौजफाटा !
झोन (विभाग) ८, सेक्टर १८, ६० सहस्र पोलीस कर्मचारी, तात्पुरती पोलीस ठाणी १३, स्थायी पोलीस ठाणी ४४, तात्पुरत्या पोलीस चौक्या २३, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २१ तुकड्या, राखीव तुकड्या २, प्रांतीय सशस्त्र दलाच्या ५ तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४ तुकड्या, एएस् चेक, १२ तुकड्या आणि बाँबशोधक आणि नाशक पथकाच्या ४ तुकड्या, असा फौजफाटा असणार आहे.