प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभासाठी ४० कोटींहून अधिक साधू, संतगण आणि भाविक येणार असल्याचे अनुमान आहे. सद्य:स्थितीत कोट्यवधी भाविक कुंभक्षेत्रात आले आहेत. त्यामुळे जेवणाच्या पत्रावळ्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आदी कचर्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या स्वच्छतेसाठी प्रयागराज प्राधिकरणाद्वारे १ सहस्र ५०० ‘गंगा सेवादूतां’ची नियुक्त करण्यात आली आहे.
आखाड्यांचे मंडप, रस्ते, गंगा नदीचा किनारा, मंदिरे आदी ठिकाणी दिवसभर ‘गंगा सेवादूत’ स्वच्छता करतांना दिसत आहेत. महाकुंभ आणि प्रयागराजचे क्षेत्र यांठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाद्वारे प्रयागराजमधील ४०० शाळा शिक्षक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांसमवेत बैठक घेण्यात आली. यांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. यासह स्वच्छतेच्या अंतर्गत संपूर्ण कुंभक्षेत्रात दीड लाख शौचालये, ५ सहस्र मुतार्या, ३५० सामूहिक शौचालये बांधण्यात आले आहेत.