प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्रातील विविध आखाडे, सहस्रावधी दुकाने आणि लाखो तंबू यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे प्रशासनापुढे मोठे आव्हान होते. या सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी प्रयागराज प्राधिकरणाद्वारे कुंभक्षेत्रात तब्बल ५६ सहस्र नळजोडण्या करण्यात आल्या आहेत.
या सर्व नळजोडण्या तात्पुरत्या स्वरूपातील असून यासाठी प्रशासनाने तब्बल १ सहस्र २४९ किलोमीटर पाईपांची जोडणी कुंभक्षेत्रात केली आहे. आखाड्यांच्या बाहेर आणि रहदारीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी ८५ कूपवाहिनी (बोअरवेल) निर्माण करण्यात आल्या आहेत. यांमुळे अन्नछत्रांमध्ये न्याहारीसह दुपार आणि रात्रीचा महाप्रसाद ग्रहण केल्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.