Digital Identification In Mahakumbh : महाकुंभात येणार्‍या प्रत्येकाची ३ पद्धतींद्वारे मोजणी होणार !

प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची मोजणी केली जाणार आहे, तसेच त्या व्यक्तीची माहितीही उत्तरप्रदेश शासनाद्वारे ठेवली जाणार आहे. यासाठी ‘एट्रिब्यूट सर्च कॅमेरा’, ‘आर्.एफ्.आई.डी रिस्ट बँड’ आणि ‘मोबाईल अ‍ॅप’ या ३ पद्धतींचा उपयोग केला जाणार आहे.

१. ‘एट्रिब्यूट सर्च कॅमेरा’द्वारे कुंभक्षेत्रात प्रवेश करणार्‍या भाविकांचा चेहरा ‘स्कॅन’ होणार आहे. आधारकार्ड चेहर्‍याशी जोडलेले असल्यामुळे संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड पहाता येणार आहे, तसेच आधारकार्डद्वारे संबंधित व्यक्तीची अन्य माहिती उपलब्ध होऊ शकते.

२. ‘आर्.एफ्.आई.डी रिस्ट बँड’ यामध्ये भाविकांच्या हातात घालण्यासाठी अशा प्रकारचे बँड देण्यात येणार आहेत. या बँडमध्ये यंत्र बसवण्यात आले आहे. ते शासनाद्वारे नियंत्रित करण्यात येणार आहे. हे बँड स्कॅन करण्याची कुंभक्षेत्रात यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे ‘व्यक्ती कुठे आहे ?’, याची माहिती प्राप्त होणार आहे.

३. भाविकांच्या माहितीसाठी शासनाद्वारे ‘मोबाईल अ‍ॅप’ सिद्ध करण्यात आले आहे. हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याविषयी उत्तरप्रदेश शासनाद्वारे भाविकांना आवाहन करण्यात येत आहे. ‘मोबाईल अ‍ॅप’ डाऊनलोड झाल्यावर संबंधित व्यक्तीचे ‘जी.पी.एस्. लोकेशन’ प्राप्त होणार आहे. यामुळे व्यक्ती कुठे आहे, हे कळणार आहे.