उत्तर भारतात राष्ट्रजागृतीच्या चळवळीत हिंदुत्वनिष्ठ सक्रीय

हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना वाढता प्रतिसाद

उत्तर भारतात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची व्याप्ती वाढत असून अनेक धर्मप्रेमी यात सहभागी होत आहेत. घुसखोर रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, तर हिंदूंना दीपावलीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण पहाता त्यावर बंदी आणण्यासाठी प्रशासनाला निवेदने देण्यात येत आहेत. याविषयी आढावा खाली दिला आहे, तसेच आग्रा येथे धर्मप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याविषयी, तसेच हरियाणा आणि ओडिशा राज्यातील प्रसारकार्याविषयी माहिती येथे दिली आहे.

हिंदुत्वनिष्ठांकडून आग्रा येथे हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या फटाक्यांवर बंदी आणण्याविषयी प्रशासन आणि पोलीसदल यांना निवेदन सादर

आग्रा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश मालपानी आणि पोलीस अधीक्षक टी.पी. सिंह यांना निवेदन देण्यात आले. फटाक्यांवर हिंदूंच्या देवतांची, तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे असतात. असे फटाके फोडल्यामुळे देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात. त्यामुळे अशा फटाक्यांची विक्री त्वरित थांबवावी, चिनी बनावटीच्या फटाक्यांचीही विक्री थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनाजगृती समितीचे आगरा समन्वयक श्री. ठाकुर सिंह, मोनिका सिंह, श्री. शुभम् सोनी, हिंदू सेनेचे आग्रा मंडल उपाध्यक्ष श्री.नवीन भरद्वाज तथा बजरंग दलचे श्री.पवन धाकड उपस्थित होते. या वेळी अतिरक्ति जिल्हाधिकारी श्री. राकेश मालपानीजी यांनी निवेदन वाचले आणि त्यांनी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांना बसण्याची विनंती केली आणि विषय पूर्णपणे समजून घेतला.

जठलाना, हरियाणा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्गास आरंभ

यमुनागर (हरियाणा) – काही दिवसांपूर्वी हरियाणातील यमुनानगर येथील जठलाना गावातील ‘पंजाबी धर्म शाळा’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्गाचे आयोजन केले गेले. या वेळी समितीचे श्री. भूपेश शर्मा यांनी धर्मशिक्षण वर्गाचा उद्देश धर्मप्रेमींना सांगितला. धर्मशास्त्रानुसार दीपावली कशी साजरी करावी, तसेच ‘फटाक्यांचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारे प्रदूषण, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे देवतांचे होणारे विडंबन’, याविषयी धर्मप्रेमींचे प्रबोधन केले. या धर्मशिक्षण वर्गानंतर धर्मप्रेमींनी साधनेला आरंभ केला.

वाराणसी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिवक्त्यांची निदर्शने

रोहिंग्यांच्या समर्थकांचे नागरिकत्व रहित करा ! – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी

आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्राभिमानी अधिवक्ते

वाराणसी – भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करावी, तसेच रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करणार्‍यांचे नागरिकत्व रहित करावे, अशी मागणी करणारे निवेदन ‘इंडिया विथ विस्डम ग्रुप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. जिल्हाधिकारी हे निवेदन केंद्रीय गृहमंत्र्यांना सादर करणार आहेत. या वेळी म्यानमारमध्ये हत्या करण्यात आलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ताही उपस्थित होते.

देशात घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांवर सर्जिकल स्ट्राईक करा ! – मनीष पाण्डेय, प्रदेश उपाध्यक्ष, हिंदू युवा वाहिनी

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

वाराणसी – म्यानमार येथून आलेले रोहिंग्या मुसलमान हे जम्मू, देहली, बंगाल, बिहार, तेलंगण आदी राज्यांमध्ये अवैधपणे रहात आहेत. त्यांचा आतंकवादी संघटनांशी संबंध आहे. यामुळे भारतात अवैधपणे रहाणार्‍या या रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलून द्या, अशी मागणी करण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठांनी शास्त्रीघाट येथील वरुणा पुलावर आंदोलन केले. या वेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासकीय अधिकारी स्वतः कार्यस्थळी उपस्थित होते. उत्तरप्रदेशातील फैजाबाद तथा बिहार येथील वैशाली जिल्ह्यातील प्रशासनालाही हे निवेदन देण्यात आले. या वेळी ‘इंडिया विथ विस्डम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पाण्डेय, विश्‍व सनातन संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री. अनिलसिंह सोनू, हिंदू सेनेचे शिवपुर मंडल अध्यक्ष श्री. हेमंत मिश्र, हिंदू जागरण मंचचे श्री. रवि श्रीवास्तव, हिंदू जनजागृती समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ आणि अन्य राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पाण्डेय यांनी ‘देशात अवैधपणे रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करावे’, असे प्रतिपादन केले.

आग्रा येथील दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

आग्रा येथील कार्यशाळेत स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन करून आध्यात्मिक उन्नती करण्याचा धर्मप्रेमींचा निश्‍चय !

आग्रा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील धर्मप्रेमींसाठी येथील ‘फ्रेंड्स गार्डन’ येथे अलीकडेच दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आग्रा समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी ‘साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र संघटक बनण्यासाठी अष्टांग साधनेची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक असल्याचे समजल्यावर हा विषय जाणून घेण्याविषयी धर्मप्रेमींनी उत्सूकता दाखवली. तसेच स्वभावदोष सारणी, स्वयंसूचना देणा या गोष्टी शिकून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करण्याचा दृढ निश्‍चय केला.

धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

१. श्री शुभम सोनी : कार्यशाळेत दोन दिवस कसे निघून गेले, हे समजलेच नाही. ‘साधना’ विषय ऐकल्यावर मी जीवनात किती मागे आहे, हे लक्षात आले. स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन यांचे महत्त्व समजले. व्यवहारात कोणी आपले दोष सांगत नाही. येथे मात्र सर्वांनी एकमेकांचे दोष आणि चुका सांगून साहाय्य केले. त्यामुळे आनंद मिळाला.
२. श्री. आनंद जैन : मी पूर्वी केवळ नामजप करत होतो; मात्र येथे आल्यावर साधना काय असते, हे समजले. कार्यशाळेत संतांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे आशीर्वाद आणि उर्जा मिळाली. ही उर्जा मी अनुभवू शकत आहे.
३. श्री. संजीव शर्मा : मी हिंदु जनजागृतीच्या संपर्कात येणे, हे ईश्‍वराचे नियोजन आहे. प्रथम माझ्या आयुष्यात रितेपणा होता; मात्र समितीच्या संपर्कात आल्यावर हा रितेपणा संपला आहे. आता हिंदुत्वाच्या कार्यासाठी वैयक्तिक कामे सोडून मी त्यात सहभागी होतो. त्यासाठी देवाचे साहाय्य मिळते.
क्षणचित्र : कार्यशाळेच्या आधी दसरोत्सव असतांनाही आदल्या दिवशी ४ धर्मप्रेमी सेवेत सहभागी झाले होते आणि त्यांना त्यातून आनंदही मिळाला.

धर्माचरणी समाज हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकेल ! – प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

राऊरकेला, ओडिशा येथील हिंदु सेनेच्या वतीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावर प्रवचनाचे आयोजन

राऊरकेला, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – आज धर्मशिक्षणाच्या आभावामुळे हिंदु समाजाला धर्म आणि राष्ट्र यांवर होत असलेल्या आघातांविषयी काहीही वाटत नाही. धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करणारा समाज निर्माण करणे आज आवश्यक आहे. असा समाज संघटित होऊन हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील कवी वस्ती येथे केले. ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती’ या विषयावर शहरातील हिंदु सेनेच्या ‘डिलक्स गल्ली’ शाखेच्या युवकांनी आयोजित केलेल्या प्रवचनात श्री. मालोंडकर बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘पूर्वी घराघरांत दैनंदिन धर्माचरण नियमितपणे केले जायचे. मंदिरातून सातत्याने उत्सव, सण याच्या माध्यामातून तसेच कीर्तन, प्रवचन, पोथीपठण अशा अनेक माध्यमातून समाजाला धर्मशिक्षण मिळायचे. गुरुकुल पद्धतीची शिक्षणव्यवस्था होती. तिचा केंद्रबिंदूच धर्माचरण हा असायचा. गेल्या दीडशे वर्षात ही परंपरा पूर्णपणे मोडकळीला आली. म्हणूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजाला अभिमान नाही.’’

सनातन संस्थेचे साधक श्री. श्रीराम काणे यांनी यावेळी विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद सांगून अध्यात्माचे महत्त्व विषद केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now