पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्याशी तुलना केल्यावरून २३ जणांवर गुन्हा नोंद

कानपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्याशी केल्याप्रकरणी कानपूरमधील २३ व्यापार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित व्यापार्‍यांनी कानपूर शहरात अनेक ठिकाणी अशी तुलना करणारी भित्तीपत्रके सर्वत्र लावली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

१. कानपूरमधील बँकांमध्ये १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याने येथील व्यापारी त्रस्त आहेत. सध्या घाऊक व्यापार्‍यांकडे सुमारे १५ लाख रुपयांची १० रुपयांची नाणी आहेत, तर किरकोळ व्यापार्‍यांकडे ७ लाखापर्यंतच्या रकमेइतकी नाणी आहेत. बँका ही नाणी स्वीकारत नसतील, तर ती ठेवायची कुठे ? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. (रिझर्व्ह बँकेने या समस्येकडे लक्ष देऊन ती त्वरित सोडवणे आवश्यक आहे, जर ती करत नसेल, तर सरकारने लक्ष द्यायला हवे ! – संपादक)

२. या परिस्थितीला पंतप्रधान मोदीच उत्तरदायी आहेत, असे या व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. याच नाराजीतून त्यांनी मोदी यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला आहे.

३. व्यापार्‍यांनी लावलेल्या भित्तीपत्रकामध्ये अर्ध्या भागात किम जोंग यांचे छायाचित्र आहे आणि त्यापुढे ‘मी जगाला नष्ट केल्याविना शांत बसणार नाही ’ असे लिहिले आहे, तर  दुसर्‍या भागात नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून त्यापुढे ‘मी व्यापार्‍याला नष्ट केल्याविना शांत बसणार नाही’ असे लिहिण्यात आले आहे.