प्रतिकूल प्रसंगांना धैयाने सामोरे जाणार्‍या आणि गुरूंप्रती भाव असणार्‍या मुरबाड (कल्‍याण, जिल्‍हा ठाणे) येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. श्रीमती निर्मला राजाराम तेलवणे (वय ८७ वर्षे) !

‘२९.११.२०२४ या दिवशी मुरबाड (कल्‍याण, जिल्‍हा ठाणे) येथील श्रीमती निर्मला राजाराम तेलवणे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. १०.१२.२०२४ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती निर्मला राजाराम तेलवणे

सौ. राजश्री श्रीकांत महाजन (श्रीमती तेलवणे आजींची मोठी मुलगी, वय ७१ वर्षे), लांजा, जिल्‍हा रत्नागिरी, सौ. भाग्‍यश्री दलाल (आजींची धाकटी मुलगी, वय ६१ वर्षे), ठाणे आणि श्री. नंदकुमार राजाराम तेलवणे (आजींचा धाकटा मुलगा, वय ६० वर्षे), ता. मुरबाड, जिल्‍हा ठाणे.

१. सांसारिक जीवनाला प्रारंभ

१ अ. माहेर आणि सासर येथील सर्वांची मने जिंकणे आणि सर्वांनीच ‘माई’ या नावाने संबोधणे : ‘आईच्‍या वडिलांची परिस्‍थिती नसल्‍याने लहानपणापासून त्‍यांचा सांभाळ त्‍यांच्‍या एका काकांनी केला. मुरबाड येथील १०० माणसे असलेल्‍या मोठ्या कुटुंबात आईचा विवाह झाला. तेव्‍हा आईचे वय केवळ १५ वर्षे होते. आमचे वडील (कै. राजाराम धोंडू तेलवणे, आध्‍यात्‍मिक पातळी ६५ टक्‍के, वय ८८ वर्षे) यांनी त्‍या काळातील परंपरेनुसार जीवनाला प्रारंभ केला. आईने प्रत्‍येक प्रसंगात लहान-मोठे सर्वांची मने जिंकली आणि हळूहळू घरातील सर्वांचीच ती माई झाली. सर्वच जण तिला (सासर आणि माहेरचे) ‘माई’ या नावानेच संबोधू लागले.

१ आ. प्रत्‍येक प्रसंगात धैर्याने सामोरे जाणे : आम्‍हा मुलांना समजू लागल्‍यापासून आई प्रत्‍येक प्रसंगात माझ्‍या वडिलांच्‍या मागे ठामपणे उभी राहिली. त्‍यासाठी तिला कितीही कष्‍ट सोसावे लागले, तरी ती प्रत्‍येक प्रसंगात न डगमगता धैर्याने सामोरी गेली.

१ इ. घरात आलेल्‍या अतिथींचे मनापासून स्‍वागत करणे : आमच्‍या घरात आलेली कुठलीही व्‍यक्‍ती कधीच विन्‍मुख गेलेली नाही. मग ती व्‍यक्‍ती कुणीही असो. रात्री-अपरात्री आलेल्‍या भुकेल्‍या जिवाला वडील भोजन वाढायला लावायचे; परंतु आईने कधीही तक्रार केली नाही. आपल्‍या घासातील घास काढून ती घरात काम करणार्‍या मुलांसाठी राखून ठेवत असे. त्‍या उभयतांनी आयुष्‍यात सतत दुसर्‍यांचा विचार केला. त्‍यामुळे आम्‍हा मुलांवरसुद्धा लहानपणापासून तेच संस्‍कार झाले. ते आम्‍हाला नेहमी सांगायचे, ‘‘आपल्‍याला भगवंत जे काही देतो, ते आपले नसून इतरांसाठी त्‍याचा विनियोग व्‍हावा’, यासाठीच देत असतो, म्‍हणून सतत देत रहा.’’

१ ई. शिस्‍तप्रिय : आई आम्‍हा पाच मुलांच्‍या संदर्भात पुष्‍कळ कठोर आणि शिस्‍तबद्ध होती. आमच्‍याकडून वडीलधार्‍यांचा चुकूनही झालेला अवमान तिने सहन केला नाही. अगदी आम्‍हा बहिणींची लग्‍ने झाल्‍यावरही तिने कधीही आम्‍हाला पाठीशी घातले नाही.

१ उ. साधू आणि संत यांची पुष्‍कळ सेवा करणे अन् कुटुंबावर संस्‍कार करून सर्वांचा आध्‍यात्मिक पाया भक्‍कम करणे : आईने जीवनात साधू आणि संत यांची पुष्‍कळ सेवा केली. आमच्‍या लहानपणापासून आमच्‍याकडे बालब्रह्मचारी भट गुरुजी म्‍हणून संन्‍यासी येत असत. ते कुणाकडून काही घेत नसत; केवळ आईच्‍या हातचे घेत असत. तिने शेवटपर्यंत न कंटाळता त्‍यांची पुष्‍कळ सेवा केली. त्‍यांनी तिचा आणि त्‍यामुळे आमचा सर्वांचा आध्‍यात्मिक पाया भक्‍कम केला. आईने अनेक स्‍तोत्र-कवच पाठांतर करवून घेऊन आमची वाणी शुद्ध करून संस्‍कार केले.

१ ऊ. उतारवयात आई-वडील दोघांवरही गुरुकृपा होऊन त्‍यांची जन्‍म-मरणाच्‍या फेर्‍यांतून मुक्‍तता होणे : वर्ष २०१६ मध्‍ये वडिलांची आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के आणि आईची आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के घोषित करण्‍यात आली. (निधनासमयी श्रीमती निर्मला तेलवणेआजींची आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के झाली होती. – संकलक) 

२. श्रीमती निर्मला तेलवणेआजी यांच्‍या निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘आजी सतत निर्विचार स्‍थितीत आहेत’, असे कुटुंबियांना जाणवणे : ‘निधनापूर्वी काही दिवस ती सतत निर्विचार स्‍थितीत आहे’, असे आम्‍हा कुटुंबियांना जाणवत होते. तिचे कुणाच्‍या बोलण्‍याकडे लक्ष नसून कुठेतरी शून्‍यात असल्‍यासारखे जाणवत होते. त्‍यामुळे ‘ती मायेत असूनही नसल्‍यासारखी रहात आहे’, हे आमच्‍या लक्षात आले.

२ आ. ‘माझा नामजप सतत चालू आहे’, असे आजींनी सांगणे : आईला नामजपाबद्दल विचारल्‍यावर ती म्‍हणाली, ‘‘मी नाम कोणते घेते, ते मला आठवत नाही; परंतु माझा नामजप सतत चालू आहे; कारण मला कशाचीच चिंता नाही.’’ त्‍या वेळी ‘तिच्‍या चेहर्‍यावरून तिची आध्‍यात्मिक प्रगती होत आहे’, असे आम्‍हा कुटुंबियांना जाणवले.

२ इ. मायेत न अडकणे : आईच्‍या नातसूनेने तिला, ‘तुमच्‍या मुलींची तुम्‍हाला आठवण येत नाही का ?’, असे विचारले (कारण आई कधीही ‘मला मुलींशी बोलायचे आहे किंवा भेटायचे आहे’, असे म्‍हणत नाही.) त्‍या वेळी ‘मुली त्‍यांच्‍या घरी सुखी आहेत, मग त्‍यांच्‍यात कशाला अडकायचे ?’, असे ती म्‍हणाली. यापूर्वीही ती कधीही ‘तुम्‍ही माहेरी रहा  या’, असे मुलींना म्‍हणत नसे. ‘तुम्‍ही तुमचा प्रपंच आधी सांभाळा’, असे म्‍हणत असे.

३. आजींच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. ‘आजीचा प्राण डोळ्‍यांतून गेला’, असे मला वाटते. तिचे डोळे उघडे होते.

आ. तिच्‍या निधनानंतर ८ घंट्यांनी तिचा ‘श्‍वास चालू आहे’, असे मला दोन तीन वेळा जाणवले.

इ. ‘तिच्‍याकडे पाहिल्‍यावर ती शांत झोपली आहे’, असे मला जाणवले आणि वातावरण पुष्‍कळ हलके असून ‘काही झाले आहे’, असे मला जाणवत नव्‍हते.

‘प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍हाला सात्त्विक आई-वडिलांच्‍या पोटी जन्‍म मिळाला आणि संस्‍कारांची दिव्‍य शिदोरी मिळाली’, याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञता ! ‘लवकरात लवकर आईची आध्‍यात्मिक प्रगती होऊन ती संतपदाला जावो’, हीच श्री गुरुचरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

सौ भाग्‍यश्री योगेश जोशी (आजींच्‍या मोठ्या मुलीची मुलगी), सनातन आश्रम, मिरज, सांगली.

१. ‘निर्मलाआजीमध्‍ये ‘व्‍यवस्‍थितपणा आणि टापटीपपणा’ हे गुण होते.

२. अपेक्षा नसणे : आजी कधीही कुणाकडून काहीच अपेक्षा करत नसे. तसे तिच्‍या बोलण्‍यातूनही व्‍यक्‍त झालेले कधीच ऐकले नाही. ‘आपण अपेक्षा कशी करणार ? आपल्‍याला त्‍याचा अधिकार नाही’, असे ती सांगायची.

३. सर्वांना आपलेसे करणे : आजी सर्वांनाच अल्‍प सहवासातही आपलेसे करत असे. सर्व समाजातील ओळखीचे आजी-आजोबांना ‘देवमाणसे’, असे म्‍हणत.

४. उतारवयात शस्‍त्रकर्म होऊनही स्‍थिर रहाणे आणि ‘आजींच्‍या इच्‍छाशक्‍तीमुळे त्‍या लवकर बर्‍या झाल्‍या’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : प्रसाधनगृहात पडल्‍याने तिच्‍या मांडीचे हाड तुटले आणि तिचे शस्‍त्रकर्म करावे लागले. वयाच्‍या ८५ व्‍या वर्षी आजीचे शस्‍त्रकर्म करण्‍याची वेळ आली, तरीही ती गुरुकृपेने स्‍थिर होती. त्‍यातून ती काही दिवसांत बाहेर पडली. त्‍याचप्रमाणे कोरोना काळातही तिला जंतूसंसर्ग (इन्‍फेक्‍शन) झाल्‍याने शस्‍त्रकर्म करावे लागले. त्‍या कठीण काळातही तिच्‍या साधनेच्‍या बळावर ती त्‍यातून सुखरूप बाहेर पडली. ज्‍यांनी शस्‍त्रकर्म केले, त्‍या आधुनिक वैद्यांनी एक वर्षानंतरही भेटीत तिची आठवणीने विचारपूस केली. ‘आजींच्‍या दांडग्‍या इच्‍छाशक्‍तीमुळे त्‍या लवकर बर्‍या झाल्‍या’, असे ते म्‍हणाले.

५. साधकांवर प्रेम करून त्‍यांच्‍याशी जवळीक साधणे : मुरबाड गावात सनातनचे सत्‍संग चालू होते. तेव्‍हा ठाणे जिल्‍ह्यातून साधक प्रसारासाठी जात असत. तेव्‍हा माझ्‍या मामाने (श्री. नंदकुमार तेलवणे) सनातनची सात्त्विक उत्‍पादने घेऊन वितरक म्‍हणून दुकानांतून विक्री चालू केली. त्‍याच समवेत मामा दैनिक ‘सनातन प्रभात’चेही वितरण करत असे. तेव्‍हा आजीने साधकांना पुष्‍कळ प्रेम दिले. त्‍यामुळे अजूनही साधक आजीची विचारपूस करतात. आजीला साधकांची आठवण आल्‍यावर तिच्‍या मनात ‘आपण काही केले’, यापेक्षा ‘साधकांनी एवढ्या लांबून येऊन आम्‍हाला सत्‍संग दिला. आम्‍हाला यातील काही कळत नाही’, असे ती सांगत असे. यातून तिचा ‘अहं न्‍यून असणे, शिकण्‍याची वृत्ती आणि कृतज्ञताभाव’ दिसून येतो.

६. गुर्वाज्ञेचे पालन केल्‍याने पुन्‍हा नव्‍याने सर्व प्रारंभ करण्‍यात कोणतीही अडचण न येणे : आजी-आजोबांच्‍या भावामुळे कितीही कठीण परिस्‍थितीत त्‍यांना देवाचे साहाय्‍य मिळत असे. आजोबांचे गुरु पूज्‍य भट गुरुजी यांनी आजोबांना त्‍यांचे स्‍वतःचे रहातेे घर आणि चांगला जम बसलेला व्‍यवसाय सोडून मुरबाड येथे जाऊन त्‍यांना नव्‍याने प्रारंभ करायला सांगितला. तेव्‍हा आजी आणि आजोबांनी कोणतीही तक्रार न करता गुरूंच्‍या आज्ञेचे पालन करून नवीन जागी पुन्‍हा नव्‍याने सर्व उभारले. दोघांनी आज्ञापालन करून घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्‍यामुळे आशीर्वाद मिळून त्‍यांचे पुन्‍हा मुरबाड येथे घर आणि दुकान लवकरच चालू झाले. आजीही तक्रार न करता आजोबांच्‍या समवेत नेटाने उभी राहिली.

गुरूंच्‍या आज्ञेचे तंतोतंत पालन करणे, त्‍यात मनात काही किंतु न आणता आणि त्‍याविषयीची मनात कौतुकाची भावनाही नसणे, हे त्‍यांच्‍या त्‍यागाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. गुरु घेत असलेल्‍या अशा परीक्षांत ते उत्तीर्ण होऊन गुरुकृपा प्राप्‍त करू शकत होते’, असे मला अनुभवता आले.

७. देवाप्रती भाव : आजी पहाटे लवकर उठून काकड आरतीला देवळात जायची. त्‍यामुळे तिचा सर्व दिनक्रम देवाच्‍या सान्‍निध्‍यात जात असे. त्‍यामुळे ‘देवच तिला ऊर्जा देऊन अखंड आनंदी ठेवत असे’, असे मला जाणवले. त्‍यामुळे तिचे कुटुंबही तिने संस्‍कारी केले. आजी पूजाही भावपूर्ण करत असे. अजूनही देवघरात पुष्‍कळ चैतन्‍य आणि ऊर्जा जाणवते.

८. प्रतिकूल प्रसंगात स्‍थिर रहाणे : आजोबांच्‍या निधनानंतरही तिने लवकर प्रसंग स्‍वीकारून त्‍यावर मात केली आणि घर सांभाळले. आपण सर्वजण अधिकाधिक ‘दत्तगुरूंचा नामजप, भजने आणि पारायणे करूया’, असे ती सांगत होती. यातून ती स्‍थिर राहून अध्‍यात्‍म समजून घेऊन जगत असल्‍याचे मला जाणवले.

९. संत आणि गुरु यांच्‍याप्रती भाव 

अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून तिच्‍या डोळ्‍यांत भाव दाटून येत. ‘आपले काहीही नसून आपल्‍याला एवढे महान गुरु मिळाले आहेत. आपण कितीही केले, तरी त्‍यांचे ऋण फेडू शकत नाही’, असे ती सांगत असे.

आ. सनातनचे ५१ वे (समष्‍टी) संत पू. जयराम जोशी यांना (सौ. भाग्‍यश्री जोशी यांचे सासरे) संपर्क केल्‍यावर ती भावपूर्ण नमस्‍कार करत असे. ‘आजी त्‍यांच्‍या समोर पुष्‍कळ लहान आहे’, असा तिचा भाव असे.

इ. ‘संतांकडून आपण किती मिळवू आणि किती नको’, अशी तिची शिकण्‍याची स्‍थिती असे.

१०. आजीत जाणवलेले पालट : ‘तिच्‍याभोवती प्रकाश आहे’, असे मला जाणवले. तिची कांती मुलायम आणि तेजस्‍वी होऊन केस काळे झाल्‍याचे माझ्‍या लक्षात आले.

११. आजी आणि आजोबा दोघांनी ‘निरपेक्ष भाव, समर्पण वृत्ती, गुरूंची अनन्‍य भक्‍ती, आज्ञापालन, त्‍यागी वृत्ती आणि निष्‍काम भक्‍ती यांमुळे गुरुदेवांचे मन जिंकले होते’, असे मला जाणवले.

१२. आजोबांचे निधन झाल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनीही सांगितले होते, ‘त्‍यांची साधना चांगली चालू आहे.’  

हे गुरुदेवा, ‘आपण आम्‍हाला असे आदर्श आजी-आजोबा दिले. त्‍यांच्‍या साधनेमुळे आज आम्‍हाला थोर गुरु मिळाले आहेत. हे गुरुमाऊली, ‘तुम्‍हीच आमच्‍याकडून त्‍यांचे गुण अंगी आणून त्‍यांच्‍यासारखी साधना करून घ्‍या आणि आमचा उद्धार करून घ्‍या’, अशी आपल्‍या कोमल चरणी भावपूर्ण याचना आहे.’

सौ. भक्‍ती उपेंद्र महाजन (कै. निर्मलाआजींची नातसून, मोठ्या मुलीची सून), लांजा, जिल्‍हा रत्नागिरी.

 १. कोणत्‍याही परिस्‍थितीला स्‍थिरतेने सामोरे जाणे आणि इतरांना आनंद देणे : ‘आजींचे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर काही दिवसांनी त्‍यांना मी ‘व्‍हिडिओ कॉल’ केला होता. त्‍या वेळी त्‍या अंथरुणावरच होत्‍या. मी त्‍यांना विचारले, ‘‘आजी तुम्‍ही कशा आहात ?’’ तेव्‍हा त्‍यांनी ‘‘मी एकदम व्‍यवस्‍थित आहे’’, असे मला सांगितले. त्‍यांच्‍या चेहर्‍यावरही ‘काहीच घडले नाही’, असे भाव मला जाणवत होते. आजींचा लहानपणापासूनचा जीवन प्रवास पाहिला, तर आजींच्‍या संदर्भात मला वाटते, ‘त्‍यांचे देवाशी अखंड अनुसंधान असल्‍यामुळे त्‍या कोणत्‍याही कठीण परिस्‍थितीला स्‍थिरतेने सामोरे जाऊ शकतात. त्‍या नेहमीच इतरांना आनंद देतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.५.२०२४)