स्थानिकांची आंदोलनाची चेतावणी
सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – ऐतिहासिक प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती आहे. या मूर्तीची सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे उत्तरदायित्व प्रतापगड-कुंभरोशी ग्रामपंचायतीचे आहे. प्रतापगड-कुंभरोशी ग्रामपंचायतीने स्थानिक इच्छुकांची काळजीपूर्वक निवड प्रक्रिया पार पाडली आहे; मात्र सुरक्षाव्यवस्थेसाठी बाहेरील व्यक्तींची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात आली असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. या मागणीवर योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी स्थानिक शिवभक्तांनी दिली आहे. यामुळे सुरक्षारक्षक नियुक्तीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याविषयी महाराष्ट्र शासन निर्मित ‘किल्ले प्रतापगड प्राधिकरणा’चे विशेष निमंत्रित सदस्य विजय नायडू यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ यांना निवेदन दिले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, प्रतापगड येथील सुरक्षेसाठी बाहेरील व्यक्तींच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या रहित करण्यात याव्यात, तसेच ग्रामपंचायत स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती कायम करण्यात यावी.