‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचे प्रदर्शित झालेले पोस्टर (भित्तीपत्रक) सामाजिक माध्यमांवर सध्या प्रसारित होत आहे. २२ नोव्हेंबर या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर सगळ्यात वर ‘एमी एला सकीना’ या अभिनेत्रीचे नाव असून तिचे नृत्य करतांनाचे छायाचित्र आहे. त्या खाली ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ असे चित्रपटाचे नाव दिसत आहे. या चित्रपटात संबंधित अभिनेत्रीचे ‘मरहबा’ हे ‘आयटम साँग’ (उत्तेजक प्रकारचे नृत्य) आहे. ‘पोस्टर’वर या गाण्याचेच विज्ञापन करण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्रपटात असे नृत्य दाखवून मराठी दिग्दर्शकांनी चित्रपटात बाजारूपणा आणला आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने चित्रपट काढायचा आणि विज्ञापन मात्र उत्तेजक नृत्याचे करायचे, याला निर्माता आणि दिग्दर्शक यांची बौद्धिक दिवाळखोरी म्हणायची कि सुनियोजित कट ?
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दिलेल्या कोणत्याही प्रलोभनांना न जुमानता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्य आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणार्थ बलीदान दिले. धर्म आणि स्वराज्य यांसाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; पण अशा प्रकारे चित्रपटाचे चुकीचे विज्ञापन करून निर्माता-दिग्दर्शक यांनी कोणता हेतू साध्य केला आहे ? चित्रपटाचे ‘पोस्टर’ पाहून चित्रपट पहायला येणार्या लहान मुलांवर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. असे करणे म्हणजे जाणूनबुजून हिंदूंंचा स्वाभिमान दुखावण्याचा सुनियोजित कट नसेल कशावरून ? असा विचार सामान्य जनतेच्या मनात येऊ शकतो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ अनंत हालअपेष्टा सोसत स्वतःच्या आयुष्याचे बलीदान देणार्या धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या चित्रपटाचे असे ‘पोस्टर’ प्रदर्शित करून त्यांचे शौर्य आणि त्याग यांचे एक प्रकारे विडंबनच केलेले आहे. यापूर्वीही ‘अनन्या’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर श्री दुर्गादेवीच्या रूपामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला वेगळ्या पद्धतीने दाखवून श्री दुर्गादेवीचे विडंबन करण्यात आले होते. आज हिंदू संघटित नसल्यामुळेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार हिंदूंच्या देवता आणि त्यांची श्रद्धास्थाने यांचे विडंबन करण्याचे धाडस करतात.
निर्माते आणि दिग्दर्शक जर स्वार्थापोटी ऐतिहासिक चित्रपटात अशा गोष्टी करत असतील, तर अशा चित्रपटांवर बंदी घालण्यासह त्यांची निर्मिती करणारे, त्यात अभिनय करणारे आणि असे चित्रपट दिग्दर्शित करणारे अशांंवरही कारवाई करणे आवश्यक आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे