कर्नाटकातील एका माणसास श्रीमहाराजांचा (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा) अनुग्रह होता. तो मूळचा श्रीमंत खरा; पण एका बाईच्या नादी लागून त्याने सर्व संपत्ती गमावली. त्याचे नातेवाइक तर त्यास दूरच ठेवत; पण श्रीमहाराजांची इतर मंडळीसुद्धा त्याच्यापासून दूर रहात असत. एकदा श्रीमहाराज गदग (कर्नाटक) येथे भीमराव यांच्याकडे गेले होते. हा गृहस्थ फाटकापाशी येऊन बसला आणि ‘मी आत येऊ का ?’, असा निरोप त्याने आत पाठवला. श्रीमहाराजांनी त्यास लगेच आत बोलावले. त्याने येऊन साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिला. श्रीमहाराज म्हणाले, ‘जगाने तुला टाकले, तरी मी तुला कधी टाकणार नाही.’ हे शब्द ऐकून तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याची भावना ओसरल्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘तुझा हा पश्चात्ताप जर खरा असेल, तर झाल्या पापाचे दायित्व मी घेतो; पण ‘पुढे असे करणार नाही’, अशी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे.’ त्याने तशी शपथ घेतली. पुढे त्याने चांगली नामसाधना केली आणि तो चांगल्या अवस्थेला गेला.
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)