कलियुगात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्‍हणजे हिंदु धर्म !

महान हिंदु धर्माचे स्‍वरूप विशद करणारी नवीन लेखमाला !

९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘हिंदु धर्म-संस्‍कृतीच्‍या वैभवाची महानता, हिंदु धर्माचे जागतिक महत्त्व आणि हिंदु धर्म-संस्‍कृतीचा अभ्‍यासक्रमात समावेश होणे आवश्‍यक’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग २)

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861677.html

विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर

६. मानवाला जीवनाच्‍या अंतिम लक्ष्याचा पूर्वानुभव देण्‍याचे उद्दिष्‍ट केवळ सर्वकल्‍याणकारी हिंदु धर्मातच असणे 

हिंदु धर्म हा विश्‍वातील अतीप्राचीन, अत्‍यंत सहिष्‍णु, वैश्‍विक चिंतन करणारा, विश्‍वाला कुटुंब मानणारा असा विलक्षण उदार आणि श्रेष्‍ठ धर्म आहे. हिंदु धर्म संस्‍कृतीने मानवाच्‍या लौकिक, पारलौकिक सर्वाभ्‍युदयाचा सर्वांगीण विचार केला आहे. व्‍यष्‍टी (व्‍यक्‍ती), समष्‍टी (सृष्‍टी) आणि परमेष्‍टी (परमात्‍मा) याचा त्रिवेणी संगम, म्‍हणजे हिंदु धर्म होय. व्‍यावहारिक उत्तमता आणि पारमार्थिक श्रेष्‍ठता यांचा उत्तम समन्‍वय हिंदु धर्मात असून मानवाला द्वैताकडून अद्वैताकडे अर्थात् मानवी विकासाच्‍या अत्‍युच्‍च शिखरावर सुप्रतिष्‍ठित करण्‍यावरच हिंदु धर्म संस्‍कृतीचा भर आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्‍याात्मिक अशा उत्‍क्रांत क्रमाने मानवाला जीवनाच्‍या अंतिम लक्ष्याचा पूर्वानुभव देण्‍याचे उद्दिष्‍ट केवळ हिंदु धर्मातच आहे. हिंदु धर्म हा सर्वकल्‍याणकारी आहे.

सर्वेऽपि सुखिनः सन्‍तु सर्वे सन्‍तु निरामयाः । 
सर्वे भद्राणि पश्‍यन्‍तु मा कश्‍चिद़् दुःखमाप्‍नुयात् ॥

अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्‍य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्‍याण पाहोत. कुणाच्‍याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

७. हिंदु धर्माला सकस तत्त्वज्ञान सांगणारे पवित्र ग्रंथ 

ऋग्‍वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे हिंदु धर्माचे अतिप्राचीन ग्रंथ असून पुराणे, उपनिषदे, स्‍मृतिग्रंथ, महाभारत अन् रामायण हे हिंदु धर्माला सकस तत्त्वज्ञान सांगणारे पवित्र अन् मार्गदर्शक ग्रंथ आहेत.

८. हिंदु धर्माची वैशिष्‍ट्ये

अ. चार आश्रम : हिंदु धर्मातील चार आश्रम, म्‍हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभूतपूर्व संगम आहे.

आ. चार वर्ण : (म्‍हणजेच व्‍यवसाय, जात नव्‍हे) हे अनुक्रमे ज्ञान, सत्ता, संपत्ती, कला यांची प्रतीके आहेत.

इ. पुनर्जन्‍म आणि कर्मविपाक : हिंदु धर्मातील पुनर्जन्‍म आणि कर्मविपाक अत्‍यंत तर्कशुद्ध अन् विज्ञाननिष्‍ठ आहेत.

ई. वृद्धांची पूजा करणे आणि स्‍त्रीला मातृरूपात पहाणे : ही हिंदु धर्माची अनन्‍यसाधारण वैशिष्‍ट्ये आहेत. ‘मातृवत् परदारेषु ।’, म्‍हणजे ‘परस्‍त्रीला मातेसमान मानावे’, हीच हिंदु धर्माची शिकवण आहे.

उ. माता-पिता-आचार्य यांच्‍या समवेत हिंदु धर्म अतिथीलाही देवासमान मानतो अन् पूजतो. ‘माता-पिता-आचार्य आणि सत्‍पात्र अतिथी यांना देवासमान मानावे’, ही तैत्तिरीय उपनिषदाची शिकवण आहे. (शिक्षावल्ली) कर्मातील भिन्‍नता; पण स्नेहातील एकता हे हिंदु धर्माचे वैशिष्‍ट्य आहे.

ऊ. संस्‍कार : अंतःकरण शुद्धीचे सर्वाधिक प्रबळ साधन म्‍हणजे संस्‍कार ! या संस्‍कारांना हिंदु धर्मात अत्‍यंत श्रेष्‍ठ स्‍थान आहे; म्‍हणूनच सर्व हिंदु जीवन १६ संस्‍कारांत निबद्ध (बांधलेले) आहे. सांस्‍कृतिक विविधतेत एकात्‍मतेचा प्रत्‍यय हिंदु धर्मच देतो.

ए. अवघ्‍या विश्‍वाला एक कुटुंब आणि एक घर मानण्‍याची वैश्‍विक अनुभूती हिंदु धर्मात आहे.

ऐ. सगुण-निर्गुणाचा अद़्‍भुत समन्‍वय हिंदु धर्मात आहे. सगुण अवतारात हिंदु धर्माचा गौरव सामावला आहे.

ओ. हिंदु धर्म केवळ स्‍वराज्‍यापुरता मर्यादित नाही. स्‍वराज्‍याचे सुराज्‍य करून तो रामराज्‍याकडेही झेपावतो.

औ. हिंदु विचारांचे अंतर्यामी सूत्र आहे, ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्‍ति ।’ (ऋग्‍वेद, मण्‍डल १, सूक्‍त १६४, ऋचा ४६) म्‍हणजे ‘एकच सत्‌तत्त्व (ईश्‍वर) आहे. त्‍या एकच सत्‌तत्त्वाला ज्ञानीजन पुष्‍कळ प्रकारची नावे देतात.’ धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, व्‍यक्‍तीगत स्‍वातंत्र्याचा उद़्‍घोष हिंदु धर्म करतो.

– विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर, पुणे.

(क्रमश:)

(साभार : हिंदु धर्म संस्‍कृती ग्रंथमाला १, ‘हिंदु धर्माचे स्‍वरूप’)