पुणे येथील ‘सिंहगड टेक्निकल इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या २६ इमारती जप्‍त

४७ कोटी ४३ लाख रुपये मिळकतकर थकीत

पुणे – शहरातील नामांकित ‘सिंहगड टेक्निकल इन्‍स्‍टिट्यूट’ने महानगरपालिकेला ४७ कोटी ४३ लाख १८ सहस्र ३०३ रुपयांचा मिळकतकर थकवला होता. त्‍या प्रकरणी न्‍यायालयाने ‘थकबाकीची रक्‍कम त्‍वरित भरावी’, असे निर्देश दिले होते. तरीसुद्धा अनेक महिने थकबाकी न भरल्‍याने एरंडवणा भागातील संस्‍थेच्‍या मुख्‍य कार्यालयासह २६ इमारती जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत. ‘एका महिन्‍यात पूर्ण रक्‍कम न भरल्‍यास या इमारतींचा लिलाव करून रक्‍कम वसूल केली जाईल’, अशी चेतावणी महापालिकेचे मिळकतकर विभागाचे उपायुक्‍त माधव जगताप यांनी दिली आहे. ‘सिंहगड टेक्निकल इन्‍स्‍टिट्यूट’ या संस्‍थेच्‍या पुणे शहरातील आंबेगाव बुद्रूक, कोंढवा बुद्रूक, एरंडवणे येथे महाविद्यालये, शाळा आहेत.

‘या इमारतींचा मिळकतकर ५ वर्षांपासून भरण्‍यात आलेला नव्‍हता. या प्रकरणी नोटीस बजावली होती; परंतु संस्‍थेने त्‍या विरोधात न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती. न्‍यायालयाने महापालिकेने केलेली कारवाई योग्‍य असल्‍याचे सांगत थकबाकी भरण्‍याचा आदेश वर्षापूर्वी दिला होता. तरीही अद्यापपर्यंत थकबाकी भरली नव्‍हती. सध्‍या या इमारती जप्‍त केल्‍या आहेत. त्‍यांना टाळे (कुलूप) लावलेले नाही. त्‍यामुळे तेथील कार्यालय आणि शैक्षणिक कामकाज चालू राहील; परंतु संस्‍थेने एका महिन्‍यात थकबाकी भरली नाही, तर पुढील कारवाई केली जाईल’, असे माधव जगताप यांनी सांगितले.