‘स्कूल व्हॅन’ला आग लागल्याचे प्रकरण
पुणे – खराडी परिसरात शाळेच्या गाडीला लागलेल्या आगीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकांची संख्या वाढवून पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (‘आर्.टी.ओ.’ने) सर्व शाळेच्या गाड्या, बस यांची पडताळणी चालू केली आहे. खराडी परिसरात आग लागलेल्या ‘स्कूल व्हॅन’ची (‘शाळेच्या गाडी’ची) सर्व कागदपत्रे पूर्ण होती. याचा ‘फिटनेस’ परवाना ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे, तर पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) वर्ष २०२७ पर्यंतचे आहे. या गाडीला आग का लागली ? याची पडताळणी केली जात आहे. या घटनेपूर्वीही ‘स्कूल व्हॅन’ची सतत पडताळणी केली जात होती. आताही पडताळणीचा वेग वाढवण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात पथकाकडून पडताळणी आणि कारवाई चालू आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
पुणे ‘आर्.टी.ओ.’ने ११ महिन्यांत एकूण दीड सहस्र ‘स्कूल व्हॅन’ची पडताळणी केली आहे. त्या वेळी ६०१ ‘स्कूल व्हॅन’ दोषी आढळल्या. त्यांच्याकडून २१ लाख ७९ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे. न्यायालयाने ४ ‘स्कूल व्हॅन’वर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. ११ महिन्यांत ‘स्कूल व्हॅन’वर एकूण २१ लाख ९९ सहस्र रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.