बीड – जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बनावट औषध साठा होत असल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. हा साठा भिवंडी येथून पुरवला जात होता. त्यामुळे भिवंडीतील नारपोली येथील मे. अॅक्वेटीस बायोटेक प्रा.लि. आस्थापनाचे संचालक मिहीर त्रिवेदी आणि द्विती सुमित त्रिवेदी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
य प्रकरणातील अन्वेषणामध्ये बनावट औषधांची तपासणी बीड येथील शासकीय औषध निरीक्षकांनी केली. त्यामध्ये मेसर्स उत्तराखंड येथील म्रीस्टल फॉर्म्युलेशन या अस्तित्वात नसलेल्या बनावट आस्थापनाकडून उत्पादित केलेल्या ‘अझीमसीम ५०० टॅबलेट’चा नमुना चाचणीसाठी घेतला होता. मुंबई येथील शासकीय औषध परीक्षण प्रयोगशाळेत हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
भिवंडीतील आस्थापन मालकांनी हा औषध पुरवठा मे. काबीज जेनेरिक हाऊस मीरा रोड, ठाणे यांच्याकडून खरेदी करून कोल्हापूर येथील विशाल एन्टरप्राईजेस यांना वितरीत केला होता, तर सुरत येथील मे. फार्मासिक्स बायोटेक या आस्थापनानेही बनावट औषध साठा भिवंडी येथील मे. अॅक्वेटीस बायोटेक प्रा.लि. कंपनी यांच्याकडून घेऊन कोल्हापूर येथील मे. विशाल एन्टरप्राईजेस या आस्थापनाकडे दिला. पैसे कमावण्याच्या उद्देशाने मालाची आणि आस्थापनांची हेराफेरी करून हा बनावट औषधसाठा वितरित होत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. त्यामुळे या बनावट औषधांचा काळाबाजार करणारी मोठी यंत्रणा असण्याची शक्यता आहे.