सिंधुदुर्ग – महाराष्ट्र शासनाने ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम शाळांमधून राबवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाच्या अंतर्गत ‘विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त श्रमदानाचे महत्त्व समजावे, आर्थिक व्यवहार कसे करावेत ?, स्थानिक परिसरात मिळणार्या वस्तूंचे महत्त्व बिंबवणे, विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देणे, तसेच विविध कौशल्ये आत्मसात व्हावीत’ यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात विद्यार्थी घेत असलेला सहभाग पहाता तो लाभदायी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘गावठी बाजारा’चे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक पातळीवर घेतली जाणारी तांदूळ, नाचणी, कोकम ही पिके, तसेच गावठी पोहे, भाज्या आदी साहित्य विक्रीस ठेवले होते. या बाजाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणलेल्या साहित्याची खरेदी केली. इयत्ता ९ वीच्या ‘स्काऊट आणि गाईड’च्या विद्यार्थ्यांनी ‘खरी कमाई’ या उपक्रमाच्या अंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
सावंतवाडी तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या चौकुळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ४ या शाळेतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे देण्यात आले. यामध्ये जर्मन भाषेची ओळख, १ ते १० अंक आदी गोष्टी शिकवण्यात आल्या.
या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांतून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनवणे, अभिनय करण्यास शिकवणे, निबंध स्पर्धा, एक दिवस बांधावर (शेती करणे), लाठी-काठी प्रशिक्षण, असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला.