रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सनातन संस्थेच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी पंचतत्त्वांचे काही सूक्ष्माशी संबंधित प्रयोग केले. तेव्हा साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सौ. अर्चना परेश साटम, ओरोस, सिंधुदुर्ग.
प्रयोग १ : साधकांना डोळे बंद करून आणि हात वर करून बोटे आकाशाच्या दिशेने करण्यास सांगितली. त्या वेळी पू. (सौ.) परांजपेआजी यांनी साधकांच्या दिशेने तीन वेळा हात फिरवला.
अनुभूती : या प्रयोगाच्या वेळी माझ्या हाताला गारवा जाणवला. ‘माझा हात सुदर्शनचक्राप्रमाणे फिरत आहे’, असे मला जाणवले.
प्रयोग २ : पू. (सौ.) परांजपेआजी यांनी फिरत्या पंख्याकडे पहाणे आणि त्यांचे चरण पंख्याच्या दिशेने करणे
अनुभूती : या प्रयोगाच्या वेळी ‘मला पंख्याची पाती पिवळसर दिसली आणि पंख्याची गती न्यून झाली’, असे मला जाणवले, तसेच ‘पू. आजींनी त्यांचे चरण पंख्याच्या दिशेने केले असता पंख्याची गती त्याहूनही न्यून झाली’, असे मला जाणवले.
प्रयोग ३ : पू. (सौ.) आजी आणि एक साधक यांच्या हाताच्या तळव्यांचे निरीक्षण करणे
अनुभूती : मला पू. आजींच्या तळव्यावर साधकाच्या हाताच्या तळव्यापेक्षा अधिक चकाकी दिसली.
प्रयोग ४ : खोलीतील दिवे बंद करून पू. आजींच्या हाताच्या तळव्यावर विजेरीचा प्रकाश टाकणे
अनुभूती : या वेळी पू. आजींच्या समोर ठेवलेल्या वस्तूची सावली मला स्पष्ट दिसत होती.
प्रयोग ५ : पू. (सौ.) आजींनी हात काळ्या पडद्याच्या समोर धरणे
अनुभूती : या वेळी ‘पू. (सौ.) आजींच्या हाताच्या मधल्या तीन बोटांतून धूर येत आहे’, असे मला जाणवले.
प्रयोग ६ : पाणी ठेवलेल्या भांड्यात पू. (सौ.) आजी यांनी हाताची बोटे बुडवणे
अनुभूती : पू. (सौ.) आजी यांनी एक एक करून हाताची बोटे बुडवली, तसा पाण्याचा रंग गुलाबी होत गेला.
प्रयोग ७ : पू. (सौ.) आजी यांनी टेकडीकडे पाहून हात फिरवणे
अनुभूती : पू. (सौ.) आजी टेकडीकडे पाहून हात फिरवत असतांना टेकडीवर प्रकाश दिसत होता.
हे सर्व गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच अनुभवता आले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’(१०.९.२०२३)
सौ. समृद्धी सचिन सनगरे, रत्नागिरी
१. ‘पू. शैलजा परांजपेआजी यांनी साधकांच्या दिशेने हात फिरवला असता (तेव्हा साधकांचा उजवा हात कोपरापर्यंत वरती होता) ‘माझ्या हाताच्या बोटांमधून कोपरापर्यंत लहरी जात आहेत’, अशी मला अनुभूती आली.
२. पंखा चालू असतांना पू. आजींनी पंख्याकडे बघितल्यावर पंख्याची गती न्यून झाली. पू. आजींनी पंख्याच्या दिशेने हात केल्यावर पंख्याची गती आणखी न्यून झाली आणि चरण केले असता पंख्याची गती आणखीनच न्यून झाली.
३. ‘पू. आजींच्या हातावर विजेरीचा प्रकाश टाकून त्याचे थर्मोकॉलच्या शीटवर प्रक्षेपण किती होते ?’, याचा प्रयोग केला. तेव्हा थर्मोकॉल अधिक प्रमाणात उजळले. त्या वेळी तेथे स्टँडवर ठेवलेल्या कॅमेराची थर्मोकॉलवरील सावली अधिक गडद रंगाची झाली.
४. पू. आजींच्या हातावर चकाकी दिसत होती.
५. पू. आजींनी हात काळ्या पडद्याच्या समोर धरल्यावर हातातून धूर निघतांना दिसला.
६. पू. आजींनी पाण्यात बोटे घातल्यावर पाण्याचा रंग गुलाबी दिसायला लागला आणि बोटे पाण्यातून काढल्यावर पाणी पूर्ववत् झाले.
७. रात्री पू. आजींनी टेकडीच्या दिशेने हात केल्यावर सूर्य उगवतांना जशी छटा असते, तसा प्रकाश दिसला.’
(१५.९.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |