मुंबईच्या लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, अपंगांसाठी राखीव, महिलांसाठी राखीव अशी डब्यांची विभागणी करण्यात आली आहे; मात्र आता ही विभागणी केवळ नावापुरतीच केली आहे कि काय ? असे वाटते. वास्तविक या सर्व डब्यांमध्ये त्या त्या प्रवाशांनीच प्रवास करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यासाठी शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे; मात्र तसे होत नाही. कार्यालयीन वेळेत गर्दी असल्याने द्वितीय श्रेणीचे तिकीट असूनही प्रवासी बेधडकपणे प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे प्रथम श्रेणीचे तिकीट असलेला प्रवासी उभा असतो आणि द्वितीय श्रेणीचे तिकीट घेतलेला प्रवासी बिनदिक्कतपणे प्रथम श्रेणीच्या डब्यात बसून प्रवास करतो. प्रथम श्रेणीचे प्रवासी अतिरिक्त पैसे भरून प्रवास करतात; कारण त्यांना आरामदायी प्रवास हवा असतो; पण द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांनी प्रथम श्रेणीच्या डब्यात गर्दी केल्याने त्यांना त्रासदायक प्रवास करावा लागतो.
तिकीट तपासनीसांचेही यावर काहीच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवासी नियम तोडून प्रवास करतात. रात्री आठ वाजल्यानंतर तर फलाटावरही तिकीट तपासनीस नसतात. खरेतर रात्री ८ वाजल्यानंतर प्रथम श्रेणीतून अनधिकृत प्रवास करणार्यांची संख्या अधिक असते. या डब्यातून मुसलमान लोक कुटुंबियांसह प्रथम श्रेणीतून प्रवास करतात. अपंगांच्या डब्यातूनही शारीरिकदृष्ट्या धडधाकट असणारे प्रवासी बिनधास्त प्रवास करतात; पण अपंगांना बसायला जागा मिळत नाही.
सध्या मुंबई उपनगरीय लोकलमध्ये वातानुकूलित लोकल चालू झाल्या आहेत. त्यातही नेहमीच्या साध्या लोकलचे तिकीट काढून अनेक जण प्रवास करतात. गर्दीच्या वेळी तिकीट तपासनीस लोकलमध्ये चढण्याचे टाळतात; म्हणून अनेकांकडून त्याचा अपलाभ घेतला जातो. विशेष म्हणजे पोलीस, महापालिका कर्मचारी हेसुद्धा वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. खरेतर त्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची अनुमती नाही; पण तरीही ते प्रवास करतांना आढळतात. इतक्यावरच हे सूत्र थांबत नाही, आता तर या वातानुकूलित लोकलमधून भिकारी आणि फेरीवालेही दिसू लागले आहेत. आता याला काय म्हणावे ?
नियमांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य असते; पण जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना दंड आकारून त्याची जाणीव करून देण्याचे दायित्व तिकीट तपासनीसांचे असते; पण हे कामचुकार तिकीट तपासनीस त्यांचे दायित्व चोख पार पाडत नाहीत. यामुळेच मुंबईच्या लोकलमधून अनधिकृत प्रवास करणार्यांची संख्या वाढत चाललेली आहे. यावर सरकार आणि प्रशासन यांनी नियंत्रण मिळवायला हवे, तसेच अशा तिकीट तपासनीसांवरही कारवाई व्हायला हवी.
– सौ. प्रज्ञा जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल.