Pakistan PM Liaquat Ali Khan : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशीद ‘शत्रूची मालमत्ता’ घोषित !

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली यांच्या कुटुंबाच्या भूमीवर बांधली होती मशीद

(‘शत्रूची मालमत्ता’ म्हणजे देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांनी भारतात सोडलेली मालमत्ता)

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील रेल्वे स्थानकासमोर बांधलेली मशीद अन्वेषणानंतर ‘शत्रूची मालमत्ता’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली यांच्या कुटुंबाच्या भूमीवर एक मशीद आणि ४ दुकाने बांधण्यात आली होती. राष्ट्रीय हिंदु शक्ती संघटनेचे निमंत्रक संजय अरोरा यांनी जिल्हाधिकारी अरविंद मल्लाप्पा बंगाली यांच्याकडे याविषयी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ‘या जागेवर अवैधपणे अतिक्रमण करून मशीद आणि दुकाने बांधण्यात आली आहेत’, असे संजय अरोरा यांनी तक्रारीत म्हटले होते. तर मुसलमान पक्षाचा दावा आहे की, ही मालमत्ता वर्ष १९३० मध्ये वक्फच्या नावावर झाली होती.

१. या प्रकरणी तक्रारीनंतर त्याची चौकशी तत्कालीन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल), शहर दंडाधिकारी, शहर मुख्य अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी केली होती. यानंतर या पथकाने त्याचा तपास अहवाल देहलीतील ‘एनीमी प्रॉपर्टी’ कार्यालयाला पाठवला. त्यानंतर भारत सरकारच्या ‘एनीमी प्रॉपर्टी’ कार्यालयाकडून सर्वेक्षणासाठी एक पथक येथे पाठवण्यात आले. या पथकाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत ती मालमत्ता ‘शत्रूची मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचे आदेश जारी केले.

२. मुसलमान पक्षकारांनी ही मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचे सांगितले होते आणि खसरा क्रमांक ९३० वर नोंदणीकृत दुकानांचे भाडे वक्फ बोर्डाकडे जमा केले जात असल्याचे सांगितले होते. यासोबतच १० नोव्हेंबर १९३७ चे एक पत्रही तपास पथकाला दिले होते. या आधारे ही मालमत्ता वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

३. तपासाच्या वेळी ही मालमत्ता ‘शत्रूची मालमत्ता’ असल्याचे निष्पन्न झाले. मालमत्तेच्या पक्षकारांना नोटीस दिली जाईल आणि नोटीस देऊनही ती जागा रिकामी केली नाही, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार ती रिकामी केली जाईल, असे शहर दंडाधिकारी विकास कश्यप यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

वास्तविक स्वातंत्र्यानंतर त्याच वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने ही भूमी ‘शत्रूची मालमत्ता’ घोषित करून ती कह्यात का नाही घेतली ?, हा प्रश्‍न आहे. काँग्रेसच्या राष्ट्रघातकी लांगूलचालनाच्या नीतीमुळे भारतात किती समस्या निर्माण झाल्या आहेत, याचे आणखी एक उदाहरण !