आली दीपावली !

दीपावलीचा उत्सव जवळ आला आहे. देशातील आणि जगभरातील हिंदूंना त्यांच्यातील एकात्मतेच्या भावनेने जोडणारा हा उत्सव आहे. हिंदूंच्या बलवान संघटनाचे ते प्रतीक आहे. वर्षातून एकदा येणारा हा सण जगभरातील लोकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याची विशेषता लक्षात घेऊन अमेरिका आणि इंग्लंड या देशांच्या संसदेतही तो साजरा केला जात असतो.

पाच दिवस विविध प्रसंगांच्या आठवणी जागृत करण्याच्या निमित्ताने हा सण साजरा केला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा अशा या पाच तिथींना जोडले गेलेले प्रसंग हिंदूंच्या मनात उत्साह निर्माण करतात. भाऊबिजेचा दिवसही दीपावलीच्या कालावधीत गणला जातो. या दिवशी यमराज बहिणीकडे जेवायला जातात, अशी हिंदु संस्कृतीमध्ये धारणा आहे. बहिणीचे रक्षण करण्याचे दायित्व तो या प्रक्रियेतून स्वतःकडे घेतो, अशीही कल्पना यामागे आहे. सांप्रतकाळी महिलांची समष्टीतील स्थिती पहाता त्यांच्या रक्षणासाठी कोणत्याही वेळी कुठेही धाव घेणे अगत्याचे झाले आहे. तरुणींचे भर रस्त्यात वासनांधांकडून खून पडतात आणि रस्त्यातून ये-जा करणारे ते क्रौर्य बघत रहातात. हे थांबले पाहिजे. दीपावली सणाचा आरंभ होणारा वसुबारस हा दिवस पहा. गाय तिच्या बछड्याला दूध पाजत उभी आहे (सवत्सधेनु), असे चित्र डोळ्यांसमोर येते. वात्सल्यप्रेमाचा तो क्षण किती हृदयस्पर्शी असतो ! पण हा आवेश टिकून रहात नाही. हिंदूंच्या कानावर गोहत्येची वृत्ते आदळतात. हिंदूंना गोहत्येचे अतीव दुःख सहन करावे लागते. नरकचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व दुर्लक्ष करण्यासारखे नाही. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीवासातील सोळा सहस्र स्त्रियांना मुक्त केले आणि नरकासुराचे पारिपत्य केले. देव समाजाच्या सुरक्षेची काळजी वाहतो ती अशी ! देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी साधना करणे म्हणजे देवाच्या अनुसंधानात रहाणे आवश्यक असल्याचे हे उदाहरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस सन्मार्गाने धनप्राप्ती करण्याची शिकवण देतो. चांगल्या नियतीच्या आधारावर धनप्राप्ती करून त्याचा विनियोग सत्कार्यासाठी करणे, ही हिंदु धर्मातील शिकवण आहे. देशात नेमके याच्या उलट घडत असून भारत देश ‘आशिया खंडात प्रथम क्रमांकाचा भ्रष्ट देश’, अशी त्याची कुप्रसिद्धी झाली आहे. शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार आणि घोटाळे उघड झाले आहेतच. सरकारमधील पदाधिकारी असे करायला लागल्यावर जनतेपुढे कोणते आदर्श रहाणार ? जनतेमधील काही नतद्रष्ट वाममार्गाला लागले आणि देशातील भ्रष्टाचार बळावला. त्यामुळेच आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा ‘भ्रष्टाचारी देश’, असा ठपका देशाच्या नावावर बसला. हिंदूंच्या संस्कृतीमध्ये असलेले दृष्टांत आणि नियम जनतेने न पाळल्यामुळे देशावरच अवकळा आल्याचे आजचे चित्र आहे. ही दीपावली देशाला अंधाराकडून उजेडाकडे नेईल, अशी अपेक्षा करूया !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now