मडगाव, ६ डिसेंबर (वार्ता.) – मोबोर समुद्रकिनार्यावर २ विदेशी वयोवृद्ध पर्यटकांना गेल्या २ दिवसांत, तर बाणावली येथे गेल्या आठवड्याच्या शेवटी कर्नाटकस्थित एका पर्यटकाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
४ डिसेंबर या दिवशी ७६ वर्षीय रशियन महिला मोबोर समुद्रकिनार्यावर चालत असतांना एका भटक्या कुत्र्याने तिचा चावा घेतला. समुद्रकिनार्यावरील जीवरक्षकांनी या महिलेवर प्राथमिक उपचार करून तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला.
५ डिसेंबर या दिवशी इंग्लंड येथील एका ६० वर्षीय पर्यटकावर मोबोर समुद्रकिनार्यावर चालत असतांना ५ भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले, तर त्यातील एका कुत्र्याने त्याचा चावा घेतला. ‘दृष्टी मरिन लाईफसेव्हर’च्या कर्मचार्यांनी पर्यटकावर त्वरित प्राथमिक उपचार केले. मागील आठवड्याच्या शेवटी कर्नाटक येथील एक पर्यटक बाणावली समुद्रकिनार्यावरील एका ‘शॅक’मध्ये (‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्यावरील उपाहारगृह) प्रवेश करतांना ३ भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. मोबोर-केळशी समुद्रकिनारपट्टीत प्रतिवर्षी भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याची ६-७ प्रकरणे घडत असतात, असा ‘शॅक’चालकांचा आरोप आहे. समुद्रकिनार्यावर पर्यटक आणि ‘शॅक’चालक कुत्र्यांना अन्न देत असल्याने तेथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. समुद्रकिनार्यांवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना वाढत राहिल्यास गोव्यात येणार्या पर्यटकांची संख्या घटणार असल्याची भीती गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.