प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकरसर यांच्या स्मारकाचे मुंबई येथे नुकतेच अनावरण झाले. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडू हा खेळाच्या साहित्यामुळे ‘ड्रेसिंग रूम’मध्ये (खेळाडूंचे साहित्य ठेवण्यासाठीचा, तसेच अन्य वापरासाठी असलेला कक्ष) बसलेला असतो. त्यामुळे कायम खेळाच्या साहित्याचा सन्मान करावा. आज अनेक खेळाडू आपल्या अपयशाचे नैराश्य बॅट किंवा इतर साहित्य फेकून व्यक्त करतात. आचरेकरसरांनी आम्हाला कायम या साहित्याचा सन्मान करण्यास शिकवले होते. त्यामुळेच आज मी यशस्वी ठरलो.’’ खेळाडूंचे वास्तव उघड करणारी ही गोष्ट खरोखरच मनाला खटकणारी आहे. क्रिकेटचेच पहायला गेल्यास आजच्या काळातील विराट कोहलीसारखे प्रसिद्ध क्रिकेटपटूही सामन्यात लवकर बाद झाल्यावर काही वेळेस मैदानाहून परततांना बॅट किंवा पॅड इत्यादी फेकून देणे, ‘ड्रेसिंग रूम’मधील साहित्य जोरात आपटणे असे करतांना आपण पाहिले होते. काही ठिकाणी तर सामन्याच्या काळात वादाची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अतीउत्साहाच्या भरात बॅट, स्टंप इत्यादी साहित्याने मारहाण करण्याच्या घटनाही स्थानिक व्यक्तींकडून घडल्याचे आपण ऐकतो. हीच गोष्ट अन्य खेळ खेळणार्या खेळाडूंच्या संदर्भातही लक्षात येते. याला राग किंवा संयमाचा अभाव कारणीभूत आहे. असे करणे हे कृतघ्नपणाचेच लक्षण आहे.
समाज प्रसिद्ध व्यक्तींचे अनुकरण करतो. त्यामुळे वरील प्रकारच्या अयोग्य गोष्टी संबंधितांकडून घडल्यास त्या कळत-नकळतपणे समाजातील लहान मुले, युवा पिढी आणि अन्य खेळाडू यांच्यावरही अयोग्य परिणाम करतात अन् त्यांच्याकडूनही घडतात, याचे भान राखणे त्यांनी आवश्यक आहे. केवळ खेळापुरताच नव्हे, तर या दोषांचा प्रभाव सर्वत्र पडून शाळेतील मुलांकडूनही अभ्यासाची पुस्तके फेकून देणे, वडीलधार्यांचे म्हणणे न पटल्यास चिडचिड करून वस्तू फेकून देणे इत्यादी अयोग्य कृती घडतात. असे चुकीचे व्यक्त होण्यातून मनाची दुर्बलताच उघड होते. खेळातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत व्यक्तीच्या वाट्याला यश-अपयश येत असते. ती शिकण्याची अन् त्यातून घडण्याची प्रक्रियाच आहे; परंतु या सर्व प्रसंगांत, तसेच परिस्थितीमध्ये आपण संयम ठेवून, आपल्याला साहाय्यभूत असणारे घटक, तसेच साहित्य यांच्याप्रती कृतज्ञ राहून आणि त्यांचा आदर ठेवून वागल्यास आपण यशाकडे वाटचाल करू शकतो. त्यासाठी संयमही बाळगायला हवा. नित्य जीवनात वस्तू किंवा व्यक्ती यांना सन्मानाची वागणूक दिल्यासच आपल्याला सन्मान मिळतो. त्यासाठी आपण सर्वांचा सन्मान राखणे, हे चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे.
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.