|
सांगली, ६ डिसेंबर (वार्ता.) – अनंतकोटी ब्रह्मांडनायक, इंदूरनिवासी, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (बाबा) आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांच्या पादुकांचे ६ डिसेंबर या दिवशी सांगली येथे भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. गुरुद्वयींच्या पादुकांचा हा दर्शनसोहळा म्हणजे भक्तांसाठी एक चैतन्यदायी आणि भावमय क्षणांची अनुभूतीच होती ! शंखध्वनी, तसेच जयघोषाच्या गजरात प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या पवित्र अन् मंगलमय चरणपादुका प.पू. बाबांचे भक्त आणि ‘श्री सद़्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. दिलीप (तात्या) भोसले यांच्या निवासस्थानी आगमन झाले. प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या पादुकांचे औक्षण अन् पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर भावपूर्ण आरती आणि भजने म्हणण्यात आली. ४ डिसेंबर या दिवशी इंदूर येथून प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या पादुकांचे प्रस्थान झाले. नाशिक आणि पुणे येथे पादुकांचा दर्शन सोहळा झाल्यानंतर ६ डिसेंबर या दिवशी सांगली येथे या पादुकांचे आगमन झाले. या वेळी सर्व भक्तांनी पादुकांच्या दर्शन सोहळ्याचा भावपूर्ण लाभ घेतला. सांगली येथे पादुकांचे आगमन झाल्यावर ‘वातावरणातील चैतन्यात वाढ झाली’, असे सर्वांनी अनुभवले.
या वेळी ‘श्री सद़्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, विश्वस्त श्री. गिरीश दीक्षित आणि श्री. दिलीप (तात्या) भोसले, तसेच भक्त उपस्थित होते.
आज ईश्वरपूर आणि औदुंबर येथे पादुकांचा दर्शन सोहळा !
७ डिसेंबर या दिवशी ईश्वरपूर (इस्लामपूर) (जिल्हा सांगली) येथे या पादुकांचे प्रस्थान होईल. तेथील भक्तांसाठी पादुकांचा दर्शन सोहळा आणि भजनांचा कार्यक्रम होईल. ईश्वरपूर येथील बाबांचे भक्त श्री. उमेश कुलकर्णी यांनी भक्तांसाठी भंडार्याचे आयोजन केले आहे. या भंडार्यानंतर पादुकांचे औदुंबर येथे प्रस्थान होईल. औदुंबर येथे दुपारी ४ वाजता पादुकांचे आगमन होईल. सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव, श्री दत्तगुरूंच्या पालखीसमोर भजनसेवा होईल. ८ डिसेंबरला औदुंबर येथील नारायणस्वामी मठ ते श्रीदत्त मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक होणार आहे. तेथे कृष्णा नदीत पादुकांना स्नान घालून प.पू. बाबांचे भक्त श्री. जोशी यांच्याकडे पादुकांचे पूजन, भजन आणि भंडारा असा सोहळा होईल. त्यानंतर सांगली येथे प.पू. बाबांच्या भक्त सौ. रेखा जाधव यांच्या निवासस्थानी पादुकांचा दर्शन आणि भंडारा सोहळा होईल.
प.पू. भक्तराज महाराज (बाबांच्या) इच्छेनुसार औदुंबर येथे सोहळा होणे !‘सांगली जिल्ह्यातील श्री दत्त महाराजांचे स्थान तीर्थक्षेत्र औदुंबर येथे भजन आणि भंडारा यांचा सोहळा व्हायला हवा’, अशी प.पू. भक्तराज महाराजांची तीव्र इच्छा होती; मात्र त्या वेळी सोहळा होऊ शकला नाही. बरीच वर्षे उलटल्यानंतर भक्तांनी प.पू. रामानंद महाराजांना प.पू. बाबांच्या इच्छेनुसार औदुंबर येथे भंडारा घेण्यास सुचवले होते. त्यानंतर प.पू. रामानंद महाराजांनी अनुमती दिली होती. तेव्हापासून प्रतिवर्षी औदुंबर येथे भंडारा होत आहे. |