शिरस्‍त्राण परिधान न करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई !

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण भागातही शिरस्‍त्राण (हेल्‍मेट) परिधान न करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्‍यास प्रारंभ झाला आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (‘आर्.टी.ओ.’ने) २०० हून अधिक सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई केली. सरकारी कार्यालयांमध्‍ये दुचाकीवरून येणार्‍या नागरिकांवरही आता कारवाई करण्‍यात येणार आहे. ‘रस्‍ता सुरक्षा समिती’चे अध्‍यक्ष अभय सप्रे यांनी पुण्‍यातील आर्.टी.ओ., पोलीस, जिल्‍हा प्रशासन यांसह इतर विभागांतील अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली होती. दुचाकीचालकांच्‍या अपघाताचे आणि मृत्‍यूचे प्रमाण अधिक असल्‍याने शिरस्‍त्राण सक्‍तीची कार्यवाही करण्‍याचे आदेश राज्‍याच्‍या वाहतूक विभागाच्‍या अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. जिल्‍हाधिकारी डॉ. दिवसे यांनी प्रशासकीय कार्यालयात शिरस्‍त्राण सक्‍तीची कार्यवाही करण्‍याच्‍या सूचनाही दिल्‍या आहेत. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्‍त कार्यालय, महानगरपालिका, जिल्‍हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजासाठी येणार्‍या नागरिकांना शिरस्‍त्राण सक्‍तीचे आदेश दिले आहेत. २ डिसेंबर नंतर ही कारवाई चालू होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्‍वप्‍निल भोसले यांनी सांगितले.