राजकीय हिंदुत्‍ववाद !

जो हिंदु राजकीयदृष्‍ट्या जागरूक आहे, तो राजकीय हिंदुत्‍वनिष्‍ठ ! लक्षात घ्‍या की, माणसाच्‍या उन्‍नतीसाठी जसा हिंदु धर्म आवश्‍यक आहे, तसा आपल्‍या राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी राजकीय हिंदुत्‍ववाद आवश्‍यक आहे. सत्‍य, अहिंसा, नैतिकता हे हिंदूंचे सद़्‍गुण हवे आहेत; पण शत्रूराष्‍ट्राशी लढतांना यांचा अतिरेक होऊन सद़्‍गुण विकृती होऊ नये, यासाठी हिंदूंचा राजकीय हिंदुत्‍ववादही आवश्‍यक आहे. हिंदु माणूस जगला, तरच हिंदु धर्म जगेल, टिकेल. हिंदूंच्‍या जगण्‍यासाठी राजकीय हिंदुत्‍व आवश्‍यक आहे.

श्री. अक्षय जोग

वर्ष १९५३ मध्‍ये एका भाषणात स्‍वातंत्र्यवीर सावरकर म्‍हणाले होते, ‘सर्व मानव तेवढा एक मानणे, हे ध्‍येय उत्तम आहे. मला ते प्रियही आहे. कुणीही दाराला कुलूप लावू नये, हा नियमही आदर्श आहे; पण जगात चोर आहेत, हे जाणून ज्‍याप्रमाणे आपण ‘कुलूप लावू नये’, हा आदर्श नियम बाजूला ठेवून आपापल्‍या घराला कुलूप घालतो, त्‍याप्रमाणे जगात इतर धार्मिक आणि राष्‍ट्रीय लोक आपल्‍या धर्माचा नि राष्‍ट्राचा विस्‍तार करत आहेत, तोवर मीसुद्धा हिंदु म्‍हणून जगले पाहिजे अन् राष्‍ट्राला हिंदुत्‍वाचे कुलूप घालणे आवश्‍यक आहे.’ (‘हिंदू’, २८ डिसेंबर १९५३)

रा.स्‍व. संघाचे संस्‍थापक डॉ. हेडगेवार म्‍हणतात, ‘हिंदु समाजाला स्‍वतःचे कल्‍याण स्‍वतःच्‍या हाताने करण्‍यास समर्थ बनवणे, हे संघाचे कार्य आहे. हिंदु समाजाने स्‍वतःचे कल्‍याण करणे, म्‍हणजे आपला हिंदु समाज स्‍वसंरक्षणक्षम बनवणे होय.’

मानवता, ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ (संपूर्ण पृथ्‍वी कुटुंब आहे), हे हिंदु धर्माचे ध्‍येय गाठण्‍यासाठी सद्यःस्‍थितीत हिंदुहित, हिंदु धर्म संरक्षण, हिंदु व्‍यक्‍तीचे संरक्षण, हिंदूंच्‍या न्‍याय्‍य, नागरी आणि मानवाधिकार यांचे संरक्षण यांसाठी हिंदुत्‍ववाद आवश्‍यक आहे. हिंदुत्‍ववाद हा संरक्षक आहे, तो आक्रमक, मूलतत्त्ववादी, आतंकवादी नाही. अहिंदूंनाही हिंदूंप्रमाणेच सर्व समान, न्‍याय्‍य, नागरी आणि मानवाधिकार देणारा आदर्शवादी असा आहे. जोपर्यंत हिंदूंवर ‘हिंदु’ म्‍हणून अन्‍याय होत राहील, तोपर्यंत हिंदूंना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी हिंदुत्‍वाची आवश्‍यकता असेल. ज्‍या वेळी हिंदुत्‍वाची आवश्‍यकता भासणार नाही, तो हिंदूंच्‍या आयुष्‍यातील सुवर्णदिन असेल; कारण तेव्‍हा सर्व विश्‍वात मानवता नांदून ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ हे त्‍यांचे स्‍वप्‍न साकार झालेले असेल. (२६.११.२०२४)

– श्री. अक्षय जोग, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्‍यासक, पुणे.