बंडखोरांची राजधानी दमास्कसच्या दिशेने कूच
दमास्कस (सीरिया) – सीरियामध्ये २७ नोव्हेंबरपासून सैन्य आणि बंडखोर यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. ५ डिसेंबरला बंडखोरांनी हमा नावाचे शहर कह्यात घेतले आहे. यापूर्वी बंडखोरांनी १ डिसेंबर या दिवशी सीरियातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर अलेप्पो यावर नियंत्रण मिळवले होते. कुर्दिश सैनिकांनी अलेप्पोचा काही भाग कह्यात घेतला आहे. हे कुर्दिश सैनिक बंडखोर गटाच्या विरोधातही लढत आहेत. त्यामुळे बंडखोर गटांनी अलेप्पोमधील कुर्दिश सैनिकांच्या तळांवर आक्रमणे केली. बंडखोर आता सीरियाची राजधानी दमास्कसच्या दिशेने जात आहेत.
हमा हे सीरियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वर्ष २०११ मध्ये सीरियात झालेल्या गृहयुद्धात बंडखोरांना हे शहर कह्यात घेता आले नव्हते.
नवीन सरकार बनवणे, हाच उद्देश ! – बंडखोरांचा प्रमुख जुलानी
बंडखोर गट ‘हयात तहरीर अल-शाम (एच्.टी.एस्.)’चा प्रमुख अबू महंमद अल-जुलानी याने सांगितले की, आमचा उद्देश राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवणे आणि लोकांनी निवडून दिलेल्या परिषदेद्वारे नवीन सरकार बनवणे आहे. या कारणासाठी आम्ही लढत राहू.