Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री !

भगव्या वातावरणात आणि साधू-संतांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार

मुंबई – भगव्या वातावरणात आणि संतांच्या वंदनीय उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात ५ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. भारतातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि समाजातील विविध समाजघटक, तसेच मान्यवर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचा हा शपथविधी भव्य सोहळा पार पडला.

असा झाला शपथविधी !

सायंकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपिठावर आगमन झाले. ‘राष्ट्रगीत’ आणि ‘राज्यगीत’ यांनी शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ईश्‍वराला साक्ष मानून शपथ घेतली, तर अजित पवार यांनी ‘गांभीर्यपूर्वक शपथ घेतो’, असे म्हटले. एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेण्यापूर्वी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि सर्व जनता यांचे स्मरण केले.

क्षणचित्र

१. शपथविधी झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी साधू-संतांच्या व्यासपिठाच्या ठिकाणी जाऊन संतांचा आशीर्वाद घेतला.

२. शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गोमातेचे पूजन करून आशीर्वाद घेतले.

१२ आखाड्यांच्या महंतांना शपथविधीचे निमंत्रण !

नव्या सरकारच्या शपथविधीसाठी नाशिक येथून १२ प्रमुख आखाड्यांचे महंत, काळाराम मंदिर महंतांसह इतर साधू-संत अशा ४० प्रमुख मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्यात स्वतंत्र मंचावर उपस्थित रहाणार्‍या देशभरातील ४०० साधू-महंतांकडून मंत्रोच्चारात मंत्रीमंडळाला आशीर्वचन देण्यात आले.

सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, अभिनेते सलमान खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांसह अन्य मान्यवर आणि अन्य राज्यांचे उपमुख्यमंत्री याप्रसंगी उपस्थित होते.

विशेष

  • ‘आई अंबाबाई गोंधळाला ये’, ‘राम सियाराम’ यांसह अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणारी गाणी व्यासपिठावरून गाण्यात आली.
  • ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमाता की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या.
  • सोहळ्याचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संघर्षाचा काळ पाहिला आहे ! – सौ. अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी

सौ. अमृता फडणवीस

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संघर्षाचा काळ पाहिला आहे. लाडकी बहीण योजना पुष्कळ चांगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळातच महिलांचा प्रतिसाद पाहून ‘सर्वांना देवेंद्र फडणवीस पुन्हा हवे आहेत’, हे जाणवत होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा विकास करतील आणि चांगल्या योजना राबवतील, असा विश्‍वास देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याविषयीचे पत्र राज्यपालांच्या प्रधान सचिवांकडे सोपवले !

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का ?, यावर शेवटपर्यंत चर्चा चालू होती. शेवटी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. ‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत’, असे देवेंद्र फडणवीस यांचे यासंबंधीचे पत्र घेऊन उदय सामंत राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर गेले होते. त्यांनी फडणवीस यांचे पत्र राज्यपालांच्या प्रधान सचिवांकडे सोपवले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन !

मुंबई – राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी ते म्हणाले, ‘‘श्री गणेशासमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुख यांची अनुभूती आली. राज्य आणि राष्ट्र यांचे कल्याण, समृद्धी अन् प्रगती यांसाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली.’’

शपथविधी सोहळ्यासाठी ५ सहस्रांहून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त !

मुंबई – शपथविधी सोहळ्यासाठी ५ सहस्रांहून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे दक्षिण मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांसह एस्.आर्.पी.एफ्. (राज्य राखीव पोलीस दल), जलद कृतीदल, दंगल नियंत्रण पथकाची कुमक, तसेच ‘डेल्टा’, ‘कॉम्बॅक्ट’, बाँबशोधक आणि नाशक पथक यांची नियुक्ती करण्यात आली होती. वाहतूककोंडी टाळण्यसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियमन केले. ‘पार्किंगसाठी (वाहनतळासाठी) जागा नसल्याने शपथविधीला येणार्‍यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा’, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते.

शपथविधीच्या वेळी घातपात होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षता घेतली होती. कार्यक्रमाच्या वेळी ५ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ उपायुक्त, २९ साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह ५२० अधिकारी आणि ३ सहस्र ५०० कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता.