France Barnier Government Fell : फ्रान्समध्ये पंतप्रधान बार्नियर यांचे सरकार ३ महिन्यांत कोसळले !

फ्रान्समध्ये पंतप्रधान बार्नियर

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये ३ महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पंतप्रधान मिशेल बार्नियर यांचे सरकार कोसळले. बार्नियर त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव संसदेत संमत झाल्याने ते कोसळले. अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने ३३१ मते पडली, तर प्रस्ताव संमत करण्यासाठी केवळ २८८ मते पुरेशी होती. आता बार्नियर यांना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडे त्यागपत्र द्यावे लागणार आहे. फ्रान्सच्या ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अविश्‍वास प्रस्ताव संमत झाल्याने सरकार कोसळले आहे. बार्नियर फ्रान्सच्या इतिहासातील सर्वांत अल्प कालावधीसाठी सरकार चालवणारे पंतप्रधान मानले जातील.
बार्नियर यांच्या त्यागपत्रानंतर मॅक्रॉन यांना नवीन पंतप्रधान नियुक्त करावा लागणार; कारण फ्रान्समध्ये जुलै २०२४ मध्येच निवडणुका झाल्या होत्या. अशा परिस्थितीत जुलै २०२५ पर्यंत निवडणुका होऊ शकत नाहीत. संसदेत सध्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता आणखी वाढू शकते.